सुमितला संपवून त्यांचा रुबाबात प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:03 AM2018-12-26T00:03:06+5:302018-12-26T00:03:13+5:30
मित वाघमारे या युवकाचा खून करून मुख्य आरोपींनी पोलिसांना चकवा देत सहा दिवस रुबाबात प्रवास केल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सुमित वाघमारे या युवकाचा खून करून मुख्य आरोपींनी पोलिसांना चकवा देत सहा दिवस रुबाबात प्रवास केल्याचे समोर आले आहे. विविध जिल्ह्यात ‘सफर’ करून त्यांनी पैशांची उधळपट्टीही केली. मात्र पोलिसांच्या तावडीतून ते सुटू शकले नाहीत. मंगळवारी पहाटे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.
बालाजी शेषकुमार लांडगे (रा.पंचशील नगर बीड) आणि संकेत भागवत वाघ (रा.शिवाजी विद्यालयाजवळ बीड) अशी आरोपींची नावे आहेत. १९ डिसेंबर रोजी सुमित वाघमारे याचा प्रेमप्रकरणातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. सुमितची पत्नी भाग्यश्री वाघमारे हिच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी बीड जिल्ह्यातून पलायन केले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार करून विविध ठिकाणी पाठविले होते. पुणे, औरंगाबाद, लातूर, अहमदनगर, जालना आदी जिल्ह्यात पोलिसांनी शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर सोमवारी रात्री हे दोन्ही आरोपी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वेस्थानकात असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सपोनि अमोल धस यांचे पथक त्याठिकाणी पाठविले. धस यांनी सापळा रचून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. मंगळवारी सकाळी त्यांना बीडमध्ये आणल्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, रोशन पंडीत, पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजकनर, अमोल धस आदींची उपस्थिती होती.
पोलिसांनी बनवली शोधपत्रिका
फरार मुख्य आरोपींचा शोध लागत नसल्याने त्यांची शोध पत्रिका त्यांच्या फोटोसह बनविण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना इमेल व मॅसेजद्वारे ती पाठवण्यात आली. अमरावती रेल्वे पोलीसांनी प्राप्त फोटोनुसार आरोपींना ओळखले आणि बडनेरा रेल्वे स्थानकात दोघांनाही मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
बालाजी, संकेतचा सहा दिवसांचा प्रवास
खून केल्यानंतर गजानन हा दुचाकी घेऊन अयोध्यानगरात आला. येथे कार सोडून बालाजी, संकेत आणि गजानन हे तिघे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून बायपास रोडला गेले. येथे गजानन याने त्या दोघांना पाडळसिंगी मार्गे अहमदनगरला जाण्यास सांगितले. त्यानंतर तो कृष्णाकडे परत आला. तोपर्यंत हे दोघेही नगरमध्ये पोहचले. संकेतच्या मित्राकडे दुचाकी सोडून ते खाजगी वाहनातून पुण्याला गेले. येथे एका पाहुण्याकडे मुक्काम केला. तेथून कल्याणला गेले. नंतर तिरूपती, विशाखापट्टनम, हैदराबाद, नागपूर, अमरावती असा प्रवास केला. बडनेरा येथून ते नागपूरला जाण्याच्या तयारीत असतानाह पोलिसांनी त्यांना पकडले.
तो आला अन् परिस्थिती पाहून गेला..
खुनाचा कट रचनारा गजानन क्षीरसागर हा घटनेनंतर फरार झाला होता. परंतु पोलिसांच्या यादीत आपण नसल्याचे त्याला समजले. तो लगेच बीडमध्ये आला. दोन दिवस राहिला, परिस्थिती पाहून पुन्हा पसार झाला. पोलिसांनी योग्य तपास करून आधी कृष्णाला ताब्यात घेतले. मंगळवारी सायंकाळी गजाननलाही बेड्या ठोकल्या.
कृष्णासह त्याचा मोठा भाऊही कटात सहभागी
सुमितचा खून हा पुर्वनियोजीत कट असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. कट रचनारा कृष्णा रविंद्र क्षीरसागर याला सोमवारी बेड्या ठोकल्या. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र, या कटात कृष्णाचा मोठा भाऊ गजानन देखील सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यालाही ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या दोघांनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा झाल्यानंतर मुख्य आरोपींना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केल्याचे समोर आले आहे.