दिवाळीनंतर माजलगावकरांना मिळणार दोन दिवसाला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:37 AM2021-09-27T04:37:21+5:302021-09-27T04:37:21+5:30
माजलगाव : धरण उशाला अन् कोरड घशाला... ही म्हण आहे. ती आता माजलगाव शहरवासीयांच्या मनातून कायमची पुसली जाणार आहे. ...
माजलगाव : धरण उशाला अन् कोरड घशाला... ही म्हण आहे. ती आता माजलगाव शहरवासीयांच्या मनातून कायमची पुसली जाणार आहे. माजलगावकरांना दिवाळीनंतर दोन दिवसाला पाणी देणार आहे. यासाठी नवीन दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी दिली.
माजलगाव शहराच्या शेजारी धरण असून देखील शहरवासीयांना महिन्यात केवळ दोन ते तीन वेळा पाणी मिळते. यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होताना दिसतात. मागील दहा, पंधरा वर्षांत शहर परिसर व लोकसंख्या वेगाने वाढत आहे. तरी पण येथील नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. परंतु एक टाकी अत्यंत जीर्ण झाल्याने चार महिन्यांपासून या टाकीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहराला पाणीपुरवठा केवळ एकाच पाण्याच्या टाकीतून होत आहे. नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी मंजरथ रोडला नवीन पाण्याच्या टाकीची मान्यता मिळविली आहे. पुढील आठवड्यात याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. एकूण तीन टाक्यांतून ३० लाख लिटर पाणी वितरित होईल, असेही शेख यांनी सांगितले.