सांडवा पूर्ववत झाल्यानंतर आरणवाडी तलाव ओसंडून वाहू लागला; पाच गावांमध्ये आंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 12:27 PM2021-08-25T12:27:47+5:302021-08-25T12:31:31+5:30

रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता.

After the drain was restored, the Aranwadi lake overflowed; Festivals in five villages | सांडवा पूर्ववत झाल्यानंतर आरणवाडी तलाव ओसंडून वाहू लागला; पाच गावांमध्ये आंदोत्सव

सांडवा पूर्ववत झाल्यानंतर आरणवाडी तलाव ओसंडून वाहू लागला; पाच गावांमध्ये आंदोत्सव

googlenewsNext

धारूर ( बीड ) : मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे आरणवाडी साठवण तलाव ओसंडून वाहू लागला आहे. काही दिवसांपूर्वी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. जन रेट्यामुळे सांडवा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. यानंतर झालेल्या पावसामुळे तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. मंगळवारी रात्री सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे दृष्य पाहून पाच गावच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. या प्रकारानंतर तलावाखालील आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी या गावातील ग्रामस्थांनी जन आंदोलन उभारले. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन दहाच दिवसात सांडवा पूर्ववत बांधण्यात आला. दरम्यान, मागील चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे आरणवाडी साठवण तलावात पाण्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. यामुळे मंगळवारी रात्री तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हे दृष्य पाहून पाचही गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जोरदार पावसामुळे रात्री चोरंबा-चारदरी रस्त्यावरील पुलावरून तब्बल सात फूट पाणी वाहत होते. 

पाच गावात हरीत क्रांती होणार 
या तलावामुळे अनेक वर्षाचे स्वप्न डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण झाले आहे. सांडवा फोडल्याने स्वप्न उधळली होती. जनरेट्यामुळे अधिकारशाही झुकली व सांडवा पूर्ववत झाला. यानंतर आता तलाव पूर्ण भरल्याने डोंगरात हरीतक्रांती करण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. 

काय होते प्रकरण ?
आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूर्ण झाले. तलाव पूर्ण भरल्याने आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. माञ, रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे अनर्थ झाला आणि तलावाचा सांडवा फोडण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. साठवण तलाव जुना असल्याने तलावाच्या दगडी भिंतीतून पाणी झिरपण्याची भिती व्यक्त करत खालील गावांच्या सुरक्षितेच्या नावाखाली सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तलावा खालील पाचही गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. विरोधाला न जुमानता सांडावा फोडत लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी पेटून उठून सांडावा पूर्ववत करावा, राज्य रस्तेविकास महामंडळ आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन उभारले होते. दरम्यान, वाढत्या जनरेट्यामुळे १० दिवसातच सांडवा पूर्ववत करण्यात आला. 

Web Title: After the drain was restored, the Aranwadi lake overflowed; Festivals in five villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.