ऊसतोड मजूरांचा संप मागे, लढा मात्र कायम सुरु राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:36 AM2018-10-22T00:36:38+5:302018-10-22T00:37:30+5:30
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक दार संघटनेच्या वतीने, ऊसतोड मजूर, मुकादमांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऊसतोड मजूरांचा संप मागे घेण्याचा निर्णय शनिवारी पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक दार संघटनेच्या वतीने, ऊसतोड मजूर, मुकादमांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऊसतोड मजूरांचा संप मागे घेण्याचा निर्णय शनिवारी पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार केशव आंधळे म्हणाले, संप जरी मागे घेतला असला, तरी मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरुच राहणार आहे.
पत्रकारपरिषदेस गोरक्ष रसाळ, संघटनेचे अघ्यक्ष श्रीमंत जायभाये व इतर मुकादम उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आंधळे म्हणाले, दुष्काळी परिस्थिती आहे. मजूरांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला जाणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेतला आहे. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड मजूरांचे प्रश्न सुटणार आहेत. आम्ही केलेल्या मागण्यापैकी अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. ज्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यासाठी संघटना कायम लढत राहील. ऊसतोड मजूरांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवा केला आहे. एक वेळ लवादाचे अध्यक्ष, सर्व सदस्य व मुख्यमंत्र्याशी चर्चा केली आहे. लवकरच महामंडळाचा देखील प्रश्न निकाली लागेल अशी आशा आंधळे यांनी यावेळी व्यक्त केली.
महामंडळाऐवजी काढला योजनेचा अध्यादेश
ऊसतोड मजूरांच्या मजूरीचा वाढ करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ घ्यावा, यासाठी शासनाला ३० आॅक्टोबर ही शेवटची तारीख देत आहोत, मागण्या मान्य झाल्या नाही तर, साखर संघाच्या इमारतीसमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी संघटनेतर्फे देण्यात आला. ऊसतोड मजूरांना ४०० रुपये मजूरी मिळावी, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, मजूरांना जिवन सुरक्षा योजना लागू करावी, यासह इतर सर्व लाभ ऊसतोड मजूरांना मिळावेत या मागण्यांसाठी संघटनेने संप पुकारला होता.
सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना १९ तारखेचा दिवस मावळण्याच्या आत होईल व महामंडळासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, महामंडळाची घोषणा झाली नाही व शुक्रवारी १९ आॅक्टोबर रोजी शासनाच्या वतीने ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार समाजिक सुरक्षा’ ही योजना राबवण्याचा अध्यादेश काढला.