पेट्रोल, डिझेलच्या भडक्यानंतर आता दूधही पोळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:27+5:302021-02-09T04:36:27+5:30
पुरूषोत्तम करवा माजलगाव : उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली की, मागील आठवड्यात सरकीपेंडीच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांपेक्षा जास्त ...
पुरूषोत्तम करवा
माजलगाव : उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली की, मागील आठवड्यात सरकीपेंडीच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांपेक्षा जास्त भाव वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दुभत्या जनावरांना खायला काय दयावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तर सर्वसामान्यांनाही दूध पोळणार असल्याचे दिसत आहे.
दुभत्या जनावरांना सरकीपेंड खायला दिली की दुध उत्पादनात मोठा फायदा होतो. त्यामुळे दुध उत्पादक इतर चा-यासोबत सरकीपेंड दुभत्या जनावरांना देतात. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली होती. परंतु उन्हाळा सुरू होताच चा-याचा प्रश्न निर्माण होतो. यावेळी थंडीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने १५ दिवसांपासून उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. उन्हाच्या तिव्रतेबरोबरच चा-याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे दुधउत्पादकांचा सरकीपेंड घेण्याकडे कल वाढला आहे. पेंडीची वाढलेली मागणी पाहता मागील आठवड्यात क्विंटलमागे ८०० रूपयांची वाढ झाली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हीच पेंड २१००-२२०० रूपये क्विंटल होती. आता २९०० ते ३००० रूपये क्विंटल झाली आहे. अलिकडच्या २०दिवसातील ही भाववाढ असून यामुळे दुधउत्पादक संकटात सापडला आह. त्यांच्यापुढे दुधाचे भाव वाढवल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही दूध पोळणार आहे.
कापूस उत्पादनात निम्म्याने घट
माजलगाव बाजार समिती अंतर्गत घेण्यात आलेल्या कापसाची यावर्षी आतापर्यंतची किंमत ८९ कोटी १० लाख रूपये असुन गेल्यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या कापसाची किंमत १९५ कोटी १७ लाख रूपये होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्यांपेक्षा कमी कापसाचे उत्पादन झाले आहे.
खुराक चांगला तर दूध चांगले
सरकी पेंड खाऊ घातल्यास दुधाचा दर्जा टिकून राहतो व खवा चांगला तयार होतो. मलाई चांगल्या प्रकारे निघण्यास मदत होते. त्यामुळे तुपही चांगले निघते. तसेच जनावरांनी पेंड खाल्यानंतर ते पाणी जास्त पितात. त्यामुळे जनावरांची पाचन क्षमता वाढुन दुधात स्निग्धता वाढण्यास मदत होते.
--- महादेव बांगर ,दुधउत्पादक ,डेपेगाव.
यावर्षी कापसाचे उत्पादन अत्यंत कमी असल्याने व सध्या कापसाचे भाव वाढल्यामुळे सरकी पेंडीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे भाव कमी होतील की नाही हे सांगणे अवघड आहे. ---रामेश्वर टवाणी ,पेंडीचे उत्पादक