ग्लासाला तोंड लावून पाणी पिल्याने खुनी हल्ला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:15 AM2018-03-15T05:15:34+5:302018-03-15T05:15:34+5:30
सप्ताह समाप्तीच्या कार्यक्रमात ग्लासाला तोंड लावून पाणी पिल्याने एका तरुणाच्या पोटात गजाने भोसकून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सुलतानपूर (ता. गेवराई) येथे २८ फेब्रुवारीला घडली. हल्ल्यात विष्णू मारोती उनवणे (३०) हे गंभीर जखमी झालेत.
बीड : सप्ताह समाप्तीच्या कार्यक्रमात ग्लासाला तोंड लावून पाणी पिल्याने एका तरुणाच्या पोटात गजाने भोसकून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सुलतानपूर (ता. गेवराई) येथे २८ फेब्रुवारीला घडली. हल्ल्यात विष्णू मारोती उनवणे (३०) हे गंभीर जखमी झालेत.
तलवाडा पोलीस ठाण्यात दोन आठवड्यांनी १३ मार्चला पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सुलतानपूर येथे २८ फेब्रुवारीला गावामध्ये माउलीच्या सप्ताहाची समाप्ती होती. प्रसाद घेतल्यानंतर विष्णू यांनी ग्लासाला तोंड लावून पाणी पिले. त्यावरून पाच जणांनी उनवणे यांना जातिवाचक शिवीगाळ करून लोखंडी गज, काठ्या, दांड्याने मारहाण केली. त्यानंतर घरात घुसून त्यांच्या पोटात गज खुपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी उनवणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष्णू यांचे वडील मारोती उनवणे यांच्या फिर्यादीवरून सावता गिन्यानदेव खेत्रे, लक्ष्मण अच्युत खेत्रे, परमेश्वर अच्युत खेत्रे, मदन परमेश्वर खेत्रे, दीपक नामदेव बनकर (सर्व रा. सुलतानपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.