पाच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पंकजा मुंडे आमदार, लोकसभेतील पराभवानंतर पुनर्वसन
By सोमनाथ खताळ | Published: July 15, 2024 01:44 PM2024-07-15T13:44:37+5:302024-07-15T13:45:20+5:30
पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने जिल्हाभरात जल्लोष केला जात असून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षाही समर्थक व्यक्त करत आहेत.
बीड : मागील पाच वर्षांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सुरू असलेला राजकीय वनवास शुक्रवारी संपला. २०१९ विधानसभा आणि २०२४ लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतरही भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन आमदार केले आहे. मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने जिल्हाभरात जल्लोष केला जात असून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षाही समर्थक व्यक्त करत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावात लढत झाली होती. यामध्ये धनंजय मुंडे यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पंकजा मुंडे फार सक्रिय नव्हत्या. मध्यंतरीच्या काळात त्यांना पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याच्या टीकाही केल्या जात होत्या. राज्यातील नेत्यांबद्दल त्यांनी अनेकदा खदखदही व्यक्त केली होती. त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. परंतु त्या भाजपसोबत एकनिष्ठ राहिल्या. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी दिली. परंतु यावेळी जातीय राजकारण झाल्याने पंकजा मुंडे यांना फटका बसला आणि अवघ्या साडेसहा हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांचे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन आमदार केल्याने त्यांचा राजकीय वनवास संपून पाच वर्षांनंतर पुनर्वसन झाले आहे.
मंत्रिपद मिळणार का?
पंकजा मुंडे यांची ओबीसी नेत्या म्हणून ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत जातीय राजकारणाचा फटका पंकजा यांच्यासह अनेक उमेदवारांना बसला. एवढेच नव्हे तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यशही आले नव्हते. या अपयशामुळेही भाजपने पंकजा यांना विधानपरिषदेवर घेत ओबीसी नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे आता आमदार झाल्या आहेत, पण त्यांना मंत्रिपद मिळणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडेंना डावलण्याचा प्रयत्न
२०१९ च्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे कुठेही पुनर्वसन झाले नाही. भागवत कराड यांना राज्यसभेवर घेतले आणि मंत्री केले. तर लातूरमधून रमेश कराड यांना आमदार केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातून पराभूत झालेले राम शिंदे यांनाही आमदार केले. येथे जातीय समीकरणे पाहिले गेली, परंतु पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला नव्हता. राज्यातील अंतर्गत राजकरणाचा फटका मुंडेंना बसला होता. त्यांना वारंवार डावलण्याचा प्रयत्नही झाल्याचे अनेकदा समोर आले होते.
आता बहीण प्रीतम मुंडेंचे काय?
भाजपने दोन वेळा पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना आमदार करून पुनर्वसन केले आहे, हे खरे असले तरी त्यांची बहीण डॉ. प्रीतम मुंडे या अजूनही विस्थापित आहेत. डॉ. मुंडे या सलग दोन वेळा खासदार झालेल्या आहेत. यावेळी त्यांची उमेदवारी कट करून पंकजा यांना दिली होती. त्यांचेही पुनर्वसन पक्ष करणार का? याकडे लक्ष लागले आहे.