कोरोना लस घेतल्यानंतर काहींचं डोकं जड पडलं, तर काहींना ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:47+5:302021-01-18T04:30:47+5:30
बीड : कोरोना लस घेतल्यानंतर शनिवारी रात्रीपासून काही लोकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले आहे. ...
बीड : कोरोना लस घेतल्यानंतर शनिवारी रात्रीपासून काही लोकांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवत असल्याचे समोर आले आहे. जवळपास १४ जणांना उपचार करून तात्काळ सुटी देण्यात आली. ही लक्षणे किरकोळ असून, कोणतीही लस घेतल्यानंतर जाणवत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. घाबरून न जाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोना लढ्यात सर्वांत पुढे होऊन आरोग्यकर्मींनी सेवा बजावली. त्यामुळे शासनाने कोरोना लस आल्यानंतर प्राधान्याने आरोग्यकर्मींना लस देण्याचे ठरविले. शनिवारी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातही बीडसह अंबाजोगाई, आष्टी, परळी आणि गेवराई येथे एका दिवसात ४५१ लोकांना लस टोचण्यात आली. सुरुवातीला काही त्रास जाणवला नाही; परंतु रात्रीच्या सुमारास काही लोकांना अंगदुखी, ताप, डोकं जड पडणे, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून आली. जे डॉक्टर आहेत, त्यांनी घरीच उपचार घेतले, तर आशासेविका व इतर कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बीड जिल्हा रुग्णालयात १४ लोकांवर उपचार करून त्यांना तात्काळ सुटी देण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम, डॉ. बाबासाहेब ढाकणे, डॉ. नरेश कासट, डॉ. संतोष धूत आदींची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान, लस घेतल्यानंतर आम्हाला कसलाही त्रास झाला नसल्याचे पहिली लस घेणारे डॉ. अनुराग पांगरीकर व डॉ. संजीवनी कोटेचा यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
यापुढे आठवड्यातील चार दिवस लसीकरण
जिल्ह्यात लसीकरणासाठी पाच केंद्रे आहेत. भविष्यात ती वाढण्याची शक्यता आहे, तसेच आता हे लसीकरण दररोज होणार नाही. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे चारच दिवस होणार आहे. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत सूचना केल्या आहेत.
कोट
कोणतीही लस घेतल्यावर अशी लक्षणे जाणवतच असतात. ही किरकोळ लक्षणे आहेत. काळजी म्हणून रुग्णालयात आणून तपासणी केली. सर्वांना लगेच सुटी देण्यात आली. घाबरून जाऊ नये.
डॉ. सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
कोट
जिल्हाभरात १९ लाेकांना किरकोळ लक्षणे जाणवली आहेत. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. अशी थोडीफार लक्षणे जाणवतच असतात. आता यापुढे मंगळवार, बुधवारी, शुक्रवार आणि शनिवारी असे चार दिवस लसीकरण होणार आहे. तशा सूचना आल्या आहेत.
डॉ.संजय कदम
नोडल ऑफिसर, लसीकरण मोहीम, बीड
कोट
लस घेतल्यानंतर मला सुरुवातीला काही त्रास झाला नाही. रात्रीच्या सुमारास डोकं जड पडणे, ताप येणे, थंडी वाजणे अशी लक्षणे जाणवली. मी घरीच उपचार घेत आहे. मला जास्त त्रास नाही.
लस घेतलेला एक लाभार्थी