मुंडे साहेबानंतर जेष्ठ कार्यकर्ते पाठीशी उभे; म्हणून माझा आवाज कोणी दाबू शकत नाही: पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:44 PM2023-03-03T17:44:59+5:302023-03-03T17:45:38+5:30
ज्येष्ठ कार्यकर्ते पाठिशी उभे राहिल्यानेच मुंडे साहेबांच्या दुःखातून सावरले; पंकजा मुंडेंचे भावोद्गार
परळी: लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर तरूण कार्यकर्त्यांबरोबरच ज्येष्ठांचंही नेतृत्व माझ्याकडं आलं. तो काळ तसा कठीणच होता, पण मुंडे साहेबांच्या पश्चात राजकारणात विकासराव डुबे (दादा) आणि दत्तापा इटके (आबा) सारखे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. माझ्या प्रत्येक निर्णयात, संकटात आणि संघर्षात सोबत राहिल्यामुळेच मला साहेबांच्या जाण्याचं दुःख पचवता आलं. राजकारणातला प्रवास इथपर्यंत करता आला. ही माणसं सोन्यासारखी आहेत, त्यांना आपण सर्वांनी मिळून जपायचं आहे असे भावोदगार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज येथे काढले.
शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे (दादा) आणि दत्तापा इटके (आबा) यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल भाजपच्यावतीने त्यांचा गुरुवारी सायंकाळी अमृत महोत्सवानिमित्त पंकजा मुंडे यांच्याहस्ते ह्दयसत्कार करण्यात आला. त्यावेळी मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर गौरवमूर्ती दत्तापा इटके, विकासराव डुबे यांच्यासह जयमाला डुबे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदराव केंद्रे, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पत्की आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारण समजते तेव्हापासून काही चेहरे कायम दिसतात. दत्ताप्पा आणि डुबे काका यांचा ही यात समावेश आहे. आजचा हा सोहळा बघून माझे मन भरून आलं आहे. आपण सर्व रक्ताच्या आणि पक्षाच्या नात्याने नाही तर संस्कारांच्या नात्याने इथे एकत्र आलो आहोत. परळी शहरात अशा प्रकारचं वातावरण कायम रहावं अशी प्रार्थना वैद्यनाथकडे करते असे त्या म्हणाल्या.
अमृतासारख्या सज्जन माणसांचा सहवास आपल्याला लाभला आहे. सज्जन माणूस बोलत नसला तरी त्यांचा आवाज फार मोठा असतो. त्यांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. ही सर्व सज्जन आणि अमृतासारखी माणसे माझ्या पाठीशी आहेत म्हणून माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. मुंडे साहेब गेल्यानंतर या माणसांची साथ मला कायम मिळत गेली. आज जेंव्हा दत्ताप्पा आणि विकास काकांच्या जीवनकार्याची चित्रफीत बघितली तेंव्हा मुंडे साहेबांची प्रकर्षाने आठवण आली. मुंडे साहेब जर आज आपल्यात असते तर म्हणाले असते “लकीरे हमारी भी बहोत खास है क्यूँ की आप जैसे हमारे साथ है". या सोहळ्याच्या माध्यमातून डुबे आणि इटके काकांसारख्या कर्मयोगी माणसांचा सन्मान करण्याचे सौभाग्य मला लाभले. आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एकत्र असण्यासारखे दुसरे कोणतेही मोठे सुख नाही. त्यांचे कुटुंब एकत्र आहे, हे सुख बघत बघत त्यांनी आयुष्याची शंभरावी साजरी करावी अशा सदिच्छा देते असं त्या म्हणाल्या.