प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न होणार साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:16+5:302021-03-29T04:20:16+5:30
शिरूर कासार : तालुका निर्मितीला २२ वर्षांचा कालावधी लोटला. तालुक्याचे ठिकाण असल्याने इथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी होती. ...
शिरूर कासार : तालुका निर्मितीला २२ वर्षांचा कालावधी लोटला. तालुक्याचे ठिकाण असल्याने इथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी होती. मात्र या ना त्या कारणाने ती मागणी व गरज प्रलंबित होती. अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना परंतु ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न साकार होत आहे. त्यासाठी मंजुरी व निधी तसेच कामाची निविदाही निघाली असून एक वर्ष कालावधीत हे काम पूर्णत्वास जाणार आहे.
तालुक्यात रायमोहा येथे ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते. मात्र तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या शिरूर शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र अशी परिस्थिती होती. परिणामी छोट्या-मोठ्या प्रसंगाला रात्री-अपरात्री बीड, रायमोहा येथे रुग्णांना घेऊन जाण्याची वेळ येत होती. त्यासाठी शिरूरलाच ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीने जोर धरला. परंतु कुठले तरी कारण कारणीभूत ठरते हा प्रश्न रेंगाळत होता. अखेर ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून शिरूरसाठी नवीन ३० खाटांचे रुग्णालय व त्यासाठी ११ कोटी २ लाख ८७ हजार ३८५ अंदाजित रक्कम मंजूर करून निविदा काढण्यात आली आहे. हे काम एक वर्ष मुदतीत पूर्ण होणार आहे. तर रायमोहा येथील सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी ९ कोटी ६ लाख ३६ हजार २४३ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय साकार होत असल्याने रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळणार असल्याने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण रुग्णालय मंजुरीसाठी यापूर्वीही माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस यांनीदेखील हा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. तर आता पालक मंत्री धनंजय मुंडे, आ. बाळासाहेब आजबे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी अथक प्रयत्न केल्याने निधी मंजूर करून निविदा काढण्यात यश मिळवले.
आरोग्य केंद्राच्या जागीच ग्रामीण रुग्णालय
शिरूर येथे सध्या सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे जागेवर ग्रामीण रुग्णालय होणार? असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलवण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले असल्याने ग्रामीण रुग्णालय कुठे होणार, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
===Photopath===
280321\img20210328155619_14.jpg