अनेक दिवसांनी योग जुळला, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची एकाच हेलिकॉप्टरमधून एंट्री
By सुमेध उघडे | Published: September 23, 2022 01:18 PM2022-09-23T13:18:16+5:302022-09-23T13:19:17+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती राहणार आहे.
बीड: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकज मुंडे यांची आज एकाच व्यासपीठावर उपस्थिती आहेत. बीड जिल्ह्यातील रेल्वेसेवेच्या उद्घाटनाप्रसंगी हे चित्र दिसून येत आहे. आष्टी येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकिशन विखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती आहे.
बीड जिल्हावासियांचे गेल्या अनेक वर्षांचे रेल्वेचे स्वप्न आज साकार होत आहे. यासाठी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे हे दोघे एकाच हेलिकॉप्टरमधून आष्टी येथे आले. पंकजा मुंडे या पुण्यात होत्या, तर फडणवीस नागपूर येथून पुण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही दिग्गज नेते सोबत एकाच हेलिकॉप्टरमधून येथे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये एक सुप्त युद्ध पेटले असल्याचे चित्र आहे. यात हे दृश्य भाजपमध्ये चांगला संदेश देणार ठरत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती राहणार आहे.
नारायणडोह - सोलापूरवाडी, लोणी-धानोरा- कडा व आष्टी रेल्वे स्थानके सज्ज झाली आहेत. या मार्गावर सहा स्थानके असून आष्टी ते नगर हे अंतर दोन तासांत पार होईल. या रेल्वेमुळे प्रवाशांसह, व्यापाऱ्यांची देखील मोठी सोय होणार आहे. आता आष्टी येथून बीड आणि नंतर परळी अशा रेल्वे विस्ताराची प्रतीक्षा बीडकरांना आहे.