निकालानंतर आर्वीत हाणामा-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:32 AM2017-12-29T00:32:52+5:302017-12-29T00:32:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरुर कासार : तालुक्यात दुस-या टप्प्यात झालेल्या २० ग्रामपंचायत निवडणुकीत आर्वीचाही समावेश होता. मंगळवारी मतदान व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : तालुक्यात दुस-या टप्प्यात झालेल्या २० ग्रामपंचायत निवडणुकीत आर्वीचाही समावेश होता. मंगळवारी मतदान व बुधवारी मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर आर्वीत त्याचे पडसाद उमटले. दोन गटांत वाद झाले. दोन्ही गटातील २१ आरोपीतांस पोलिसांनी अटक केली आहे. गावात सध्या शांतता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली.
निर्मला रावसाहेब जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीत तुम्ही आम्हाला ग्रा.पं. निवडणुकीत मतदान का केले नाही, तुमची आमच्या विरोधात पॅनल टाकण्याची काय गरज होती? असे म्हणून जातीवाचक भाषेत शिवीगाळ करीत दगडफेक केली. यावरूनी ६० जणांविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.
तर जयश्री लक्ष्मण जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी मुलगी सुकेशिनी लक्ष्मण जोगदंड ही अरुण भोसले यांचे पॅनलमध्ये ग्रा.पं.सदस्यपदासाठी उभी होती. मतमोजणी झाल्यानंतर ती पराभूत झाली. आम्ही सर्व आमचे घरी होतो. बुधवारी दुपारी २.३० सुमारास आम्हाला नेण्यासाठी भोसलेवस्तीवर जीप आली होती. यावेळी तेथे आमचे भावकीतील १३ जणांनी संगनमत करुन सदर गाडीवर दगलफेक करून मारहाण केली.सोडवायला गेल्यावर ‘आमच्या विरोधात निवडणूक लढवली म्हणून आम्ही पराभूत झालो’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यावरून दोन्ही गटांनी परस्परांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळाला पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी भेट दिली.
पोलिसांचा बंदोबस्त
आर्वीतील वाद समजताच उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील, शिरुर ठाण्याचे पो. नि. सुरेश चाटे हे फौजफाट्यासह आर्वीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.