साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:15 IST2023-03-21T12:13:55+5:302023-03-21T12:15:02+5:30

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते

After selling three and a half tons of onions, minus bill generated, the farmer had paid himself | साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

बीड : बाजारात भाव पडल्याने कांद्याने उत्पादक शेतकरी आणि कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून पदरात काहीच पडले नाही, उलट अडत व्यापाऱ्याला १८०० रुपये देण्याची वेळ बीड तालुक्यातील जैताळवाडी येथील भागवत सोपान डांबे या शेतकरी कुटुंबावर आली. ७० हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने आम्ही जगायचे कसे ? मुलाचे शिक्षण करायचे कसे, असा प्रश्न व्यवस्थेला केला आहे.

जैताळवाडी येथील भागवत डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा ७० हजार रुपये खर्च केला. १२० गोण्यात भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला. कांदा विक्री केल्यानंतर हाती पडलेली पट्टी पाहून आणि आणखी १८३२ रुपये जमा करण्याचे अडत्याने सांगितल्याने भागवत डांबे व मुलाला धक्काच बसला. गावाकडून पैसे मागवून घेतले. तिकिटासाठी शंभर रुपयेदेखील उरले नव्हते. रिकाम्या हाताने आलेल्या भागवतरावांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कुटुंबही रात्रभर रडले. जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकरी कुटुंबाने केला.

काहीच हाती लागले नाही
कांदा चांगला निघाल्याने किमान दीड लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. यातून मुलांचे शिक्षण, लग्न, घरप्रपंच चालवता येईल, असे वाटले होते; पण काहीच हाती लागले नाही.
- भागवत डांबे, शेतकरी, जैताळवाडी

लेकरांनी कष्ट केले, आता चिंता
लेकरांनी काबाडकष्ट करून कांदा पिकवला. त्याने दिवस रात्र मेहनत केली. काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते. मीही मदत केली. खर्च खूप झाला; पण त्याच्या हातात काहीच पडले नाही. सोलापूरहून येताना भीक मागून दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझे लेकरू आले आता इकडे तिकडे फिरत आहे. घर चालवायची चिंता त्याला सतावत असल्याचे भगवान डांबे यांच्या आई कमलबाई यांनी सांगितले.

साडेतीन टन कांदा विकून रुपया मिळत नसेल तर जगायचे कसे?
कांद्याच्या उत्पन्नातून माझे शिक्षण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याचे बिल आणि पट्टी पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. उलट अठराशे रुपये अडत व्यापाराला देऊन रिकामे यावे लागले. साडेतीन टन कांदा त्यातून एक रुपया मिळाला नसेल तर आम्ही जगायचे कसे सांगा, असा प्रश्न शेतकरी पुत्र संदीप डांबे याने केला.

कांद्याला मिळाला ५० रुपये क्विंटल भाव
१) भगवानराव डांबे १५५० किलो कांद्याचे ७७५ रुपये आले. बाजारातील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २१५८ रुपये झाला.त्यांना मायनस पट्टी मिळाली. शेतकऱ्याला पदरचे १३८३ रुपये अडत्याला द्यावे लागले.

कांद्याला मिळाला १०० रुपये क्विंटल भाव
२) डांबे यांनी २०११ किलो कांदा विकला असता शंभर रुपये क्विंटल भाव मिळाला. फक्त २१३५.२० रुपये पट्टी आली. अडत्याकडील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २५८३.८९ आला. ४४८.६९ रुपये शेतकऱ्याला पदरचे भरावे लागले.

Web Title: After selling three and a half tons of onions, minus bill generated, the farmer had paid himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.