हल्ल्यानंतर आता शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी
By सोमनाथ खताळ | Published: April 6, 2024 05:15 PM2024-04-06T17:15:24+5:302024-04-06T17:15:35+5:30
बीड ग्रामीण ठाण्यातील प्रकार : जखमीने छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयातून पाठविला जबाब
बीड : शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह ११ जणांविरोधात शुक्रवारी रात्री बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शनिवारी सकाळीच दुसऱ्या गटाच्या एकाने छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयातून जबाब थेट बीड ग्रामीण पोलिसांना पाठविला. यातही ज्ञानेश्वर खांडेसह कट रचल्याप्रकरणी काही राजकीय लोकांची नावे आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठाण्यात लोकांनी गर्दी केली होती. परंतू याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
ज्ञानेश्वर खांडे (रा.म्हाळसजवळा ता.बीड) यांना बुधवारी सायंकाळी गावी जाताना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक हरिभाऊ खांडे, गणेश हरिभाऊ खांडे, नामदेव हरिभाऊ खांडे, गोरख ऊर्फ पप्पू शिंदे यांच्यावर कट रचला म्हणून, तर सुनील पाटोळे, बाबा रतन पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला धुनगव व इतर तीन जणांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळीच दुसऱ्या गटातील श्रीमंत प्रल्हाद डोळस (वय ३८ रा.म्हाळसजवळा ता.बीड) यांनीही छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयात पोलिसांना जबाब दिला आहे. यात त्यांनी ज्ञानेश्वर खांडे यांच्यासह इतर १३ जणांची नावे घेतली आहेत.
विशेष म्हणजे, डोळस यांनीही कट रचल्याप्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्यासह त्यांच्या दोन भावांची नावे घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करावा, यासाठीच म्हाळसजवळा गावातील शेकडो लोक बीड ग्रामीण ठाण्यात आले होते. शनिवारी सकाळपासूनच त्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत ठाण्यात गर्दी केली. परंतू शनिवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
बीड ग्रामीण पोलिसांकडून दुजाभाव
ज्ञानेश्वर खांडे आणि श्रीमंत डोळस यांच्या तक्रारींमध्ये राजकीय लोकांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शिवसेनेचेच आहेत. ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत तातडीने जबाब घेऊन गुन्हा दाखल केला. आता दुसऱ्या गटानेही जबाब दिल्यानंतरही चौकशीच्या नावाखाली तो प्रलंबित ठेवला जात आहे. बीड ग्रामीण पोलिस हे कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आराेप ठाण्यात जमलेल्या लोकांनी केला आहे. त्यामुळे येथील ठाणेदार शिवाजी बंटेवाड वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
चौकशी करून पुढील कारवाई
छत्रपती संभाजीनगरहून जबाब आला आहे. परस्परविरोधी तक्रार असल्याने चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. जे लोक पोलिस ठाण्यात आले होते, त्यांना मी स्पष्टीकरण दिले आहे.
- शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, बीड ग्रामीण