"भाजप बुथप्रमुखाच्या हत्येनंतर कुटुंबाच्या भेटीपेक्षा बावनकुळेंना सेटलमेंटची भेट महत्त्वाची वाटली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:59 IST2025-02-17T17:58:35+5:302025-02-17T17:59:00+5:30
आमचे गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा बोला, असं मला सांगत होते. पण मी आजपर्यंत बोललो नव्हतो, असं देशमुख म्हणाले.

"भाजप बुथप्रमुखाच्या हत्येनंतर कुटुंबाच्या भेटीपेक्षा बावनकुळेंना सेटलमेंटची भेट महत्त्वाची वाटली"
BJP Chandrashekhar Bawankule: भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी निशाणा साधला आहे. "१० वर्षांपासून भाजपचे बुथप्रमुख असणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांना मुंडे आणि धस यांची सेटलमेंटसाठी भेट घडवून आणणं महत्त्वाचं वाटलं, याचा आम्हाला खेद वाटतो," अशा शब्दांत धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, "बुथप्रमुख हा कोणत्याही पक्षाचा पाया असतो. संतोष अण्णा देशमुख हे १० वर्षांपासून भाजपचे बुथप्रमुख म्हणून काम करत होते. पण त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना भेटण्यापेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजकीय नेत्यांच्या भेटी घडवून आणणं महत्त्वाचं वाटलं. आमचे गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा बोला, असं मला सांगत होते. पण मी आजपर्यंत बोललो नव्हतो," असं देशमुख म्हणाले.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आगामी काळात काय पावलं उचलायची, हे ठरवण्यासाठी आज मस्साजोगच्या गावकऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
"... तर टोकाचं पाऊल उचलणार"
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला, तर आम्ही कुटुंब टोकाचे पाऊल उचलू. याला शासन जबाबदार राहील, असा इशारा सरपंच संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे पोलिस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना कोणीही दगाफटका करू नये. ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. आष्टी येथील भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीने आपल्या मनात कसलीही चलबिचल झालेली नाही; परंतु या प्रकरणात एखादा आरोपी वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये. सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ही आपली प्रामाणिक इच्छा असल्याचेही देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.