खळबळजनक विधानानंतर पंकजा मुडेंनी भाषणाचा संपूर्ण व्हिडिओच केला ट्विट, म्हणाल्या...
By अनिल लगड | Updated: September 28, 2022 19:30 IST2022-09-28T19:26:16+5:302022-09-28T19:30:08+5:30
माझ्या विधानाचा नकारात्मक अर्थ पसरविला जात असल्याचे पंकजा मुडेंनी म्हटले आहे

खळबळजनक विधानानंतर पंकजा मुडेंनी भाषणाचा संपूर्ण व्हिडिओच केला ट्विट, म्हणाल्या...
बीड : अंबाजोगाई येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या एका भाषणातील वंशवादावरील मुद्दा व ‘मोदी मला संपवू शकणार नाहीत’ अशा प्रकारच्या विधानावरून खळबळ उडाली आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत बुधवारी संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करीत आपल्या भाषणातील केवळ अर्धवट एक ओळच वापरून विनाकारण नकारात्मक अर्थ पसरविला जात आहे, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
माझ्या भाषणातील एक ओळ आपल्यापर्यंत आलीच आहे. ‘सनसनी खेज’ बातम्यांतून जमले तर संपूर्ण भाषणही पहा. मतितार्थ लक्षात येईल, असा टोला पंकजा मुंडे यांनी वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांना सोशल मीडियातून लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकतं नाही. मी जर लोकांच्या मनामध्ये राज्य केलं तर नरेंद्र मोदी देखील मला संपवू शकणार नाही, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या याच भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17sepपासून विविध कार्यक्रम केले,त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights.आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे,"सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पहा,मतितार्थ लक्षात येईल.पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या linkवर आहेच.धन्यवाद.https://t.co/vvgRC0poti
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 27, 2022
जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या संपूर्ण भाषणाचा मतितार्थ लक्षात न घेता त्यातील मोजकीच काही वाक्ये घेऊन पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.