तीन वर्षांनंतर होणार बीड जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:59 PM2019-06-11T23:59:21+5:302019-06-11T23:59:43+5:30
मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे.
बीड : मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे दोन ते सात हजार रूपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.मात्र, आता हा भूर्दंड टळणार असून पुढच्या आठवड्यात या मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपºयातून उपचारासाठी रूग्ण येतात. यामध्ये अपघात व इतर आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांचा समावेश असतो. या रूग्णांना इतर सर्व सुविधा दिल्या जातात, परंतु रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यासाठी येथे मशीनच नसल्याने डॉक्टर नाइलाजाने त्यांना खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखवित होते. यामुळे रूग्णांना दोन ते सात हजार रूपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही मशीन सूरू करण्याचा प्रयत्न केला. मशीन आली होती, मात्र त्यासाठी केबल नसल्याने ती कार्यान्वीत करण्यात आली होती. केबलसाठी निधीचीही मागणी केली होती. मात्र, हा निधी येण्याची वाट न पाहता लोकसहभागातून केबल घेतले. सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी दोन लाख रूपयांचा खर्च करून हे केबल देण्यासह ते कार्यान्वीत करण्यासाठी मदत केली. त्यामुळे ही मशीन पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अपुरे साहित्य उपलब्ध करून घेतले. त्यामुळे आता रूग्णांचे हाल होणार नाहीत. पुढील आठवड्यात सीटीस्कॅन मशीन सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ.अशोक थोरात
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड