वीस दिवसांनी सुटला वडखेलचा पाणीप्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:30+5:302021-05-09T04:35:30+5:30
परळी : वीस दिवसांपासून बंद असलेला वडखेलचा पाणीपुरवठा प्रशासनाच्या मदतीमुळे कायमचा सुटला आहे. शेतकऱ्यांसमक्ष रस्त्यावरील दगड, माती काढून ...
परळी : वीस दिवसांपासून बंद असलेला वडखेलचा पाणीपुरवठा प्रशासनाच्या मदतीमुळे कायमचा सुटला आहे. शेतकऱ्यांसमक्ष रस्त्यावरील दगड, माती काढून वाट मोकळी झाल्याने पाणी सोडण्यात आले.
परळी तालुक्यातील वडखेल येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगतच्या शेतकऱ्यांनी आजूबाजूला दगड व मातीचे ढिगारे टा्कून विहिरीकडे जाणारा रस्ता अडविला होता. त्यामुळे गावकऱ्यांचा मागील वीस दिवसांपासून पाणीपुरवठा बंद होता. याबाबत ग्रामस्थांनी बुधवारी ग्रामसेवकांकडे लेखी निवेदन देऊन गावचा पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शनिवारी तलाठी डिगांबर साबणे व ग्रामसेवक अविनाश तोटे यांनी वडखेल येथे जाऊन संबंधित शेतकऱ्यांची भेट घेऊन समजावून सांगितले. शेतकऱ्यांनी चूक मान्य करून तेथील दगड व मातीचे ढिगारे जेसीबीच्या साहाय्याने काढून घेतले. त्यामुळे मागील वीस दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा शनिवारी दुपारी दोन वाजता सुरू करण्यात आला. यावेळी सरपंच पिंटू देवकते, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत देवकते, गोविंद देवकते, अंगद गंगने, गणेश देवकते, पवनकुमार बोडके व शेतकरी मनोहर देवकते हे उपस्थित होते.
सामंजस्याने प्रश्न सुटला
गावात कुठलाही वाद न होता पाण्याचा प्रश्न सुटल्याचा आनंद आहे. संबंधित शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व गावकऱ्यांनी सामंजस्याने प्रश्न सोडविल्याचा खूप आनंद झाला. गावातील सर्वच प्रश्न अशाच पद्धतीने एकोप्याने सोडवावेत.
- शामसुंदर महाराज सोन्नर,
ग्रामस्थ वडखेल.