अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री मास्क काढून चंद्रासारखा मुखडा दाखवणार: सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:35 PM2022-05-14T13:35:05+5:302022-05-14T13:35:35+5:30
राज्य सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.
- सखाराम शिंदे
गेवराई : अडीच वर्षानंतर आज मुख्यमंत्री मास्क काढून आपला चंद्रासारखा मुखडा दाखवणार आहेत. मात्र, त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्माण करता आलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याची टीका माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी केली. शिल्लक उसामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तालुक्यातील हिंगणगाव येथील ३२ वर्षीय शेतकरी नामदेव जाधव याने कारखाना गाळपास ऊस नेत नसल्याने नैराश्यातून तीन दिवसांपूर्वी एक एकर उसाला आग लावून आत्महत्या केली होती. माजी मंत्री व शेतकरी नेते आ. सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. पुढे बोलताना खोत म्हणाले, हे सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे राहिले नाही. साखर कारखानदार आता मक्तेदार असल्यासारखे वागू लागले आहेत. मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याकडे गार्भियाने पाहिले नाही. त्यामुळेच हिंगणगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली.
यावेळी आ.लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, बाळासाहेब मस्के, राजेंद्र राक्षसभुवनकर, श्रीनिवास भोसले, अशोक भोसले, प्रकाश सुरवसे, दादासाहेब गिरी, राजु आष्टेकर, रामदास पवार, प्रा.शाम कुंड, सचिन मोटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.