अनिल जगतापांच्या गळ्यात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची माळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:14 PM2022-03-16T19:14:42+5:302022-03-16T19:16:15+5:30

कोरोनाकाळात रक्ताचे नातेही दुरावले होते. अशा परिस्थितीत जगताप यांनी पोलीस, पत्रकार, आरोग्य विभाग, नगरपालिका, उपेक्षित, वंचित घटकांमधील लोकांना दररोज दोनवेळचे घरपोच जेवण दिले. त्याचीच पुण्याई आता जगतापांच्या कामी आल्याची चर्चा आहे.

again Anil Jagtap is appointed as Shiv Sena Beed district chief | अनिल जगतापांच्या गळ्यात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची माळ

अनिल जगतापांच्या गळ्यात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची माळ

googlenewsNext

बीड : जवळपास चार महिने दररोज एकाचवेळी ४०० डबे घरपोच पुरविणाऱ्या अनिल जगतापांना कोरोनाकाळातील पुण्याई कामी आली आहे. मागील चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख (पश्चिम) पदाची माळ जगताप यांच्या गळ्यात पडली आहे. यापूर्वीही जगताप यांनी १३ वर्षे या पदावर काम केलेले आहे. आता पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगताप यांची सोमवारी जिल्हाप्रमुख पदी निवड केली आहे.

नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी बीड शहरातील चंपावती क्रीडा संकुलावर साधारण २००६ साली मोठा कार्यक्रम घेतला. तो आटोपून परत जात असतानाच जालना रोडवर अनिल जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राणे यांच्या वाहनांवर दगडफेक केली. याची दखल स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. दसरा मेळाव्यात या घटनेचा जाहीर उल्लेख करून आमच्या उद्धवसोबत कायम रहा, असे सांगितले होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच त्यांना जिल्हाप्रमुख पद मिळाले. नव्या दमाचे जगताप यांनी लागलीच पक्ष संघटनासाठी धावपळ सुरू केली. साधारण २००८-०९ साली शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी ‘देता की जाता’ असे मेळावे शिवसेनेने राज्यभर घेतले. बीडमध्येही छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर हा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. राज्यात सर्वात मोठा मेळावा म्हणून याची शिवसेना भवनात नोंद झाली. त्यानंतर ‘आसूड मोर्चा’ही गाजला.

शिवसेनेच्या ‘शिवजल क्रांती’ या अभियानातही जगताप यांचे काम उल्लेखनीय होते. १०१ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा हा सामाजिक उपक्रमही गाजला होता. १३ वर्षे जिल्हाप्रमुख पद भूषविल्यानंतर २०१९मध्ये त्यांना बाजूला करून कुंडलिक खांडे यांना जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. परंतु, गतवर्षीच्या गुटखा प्रकरणात नाव आल्याने खांडे यांच्या पदावर गदा आली. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून हे पद रिक्त होते. आता पुन्हा एकदा जगताप यांनाच या पदावर प्रभारी म्हणून नियुक्ती दिली आहे. आता ते कशाप्रकारे काम करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोराेनात भरवला घास
कोरोनाकाळात रक्ताचे नातेही दुरावले होते. अशा परिस्थितीत जगताप यांनी पोलीस, पत्रकार, आरोग्य विभाग, नगरपालिका, उपेक्षित, वंचित घटकांमधील लोकांना दररोज दोनवेळचे घरपोच जेवण दिले. त्याचीच पुण्याई आता जगतापांच्या कामी आल्याची चर्चा आहे.

क्षीरसागरांसोबत करावे लागणार काम
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून जगताप यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांविरोधात ‘बाण’ ताणला होता. क्षीरसागर, विनायक मेटे व जगताप अशी तिहेरी लढत झाली होती. आता क्षीरसागर यांनी हातावर शिवबंधन बांधल्याने एकेकाळचे विरोधक असलेले क्षीरसागर-जगताप यांना सोबत खिंड लढवावी लागणार आहे. जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत असलेले इच्छुक व माजी पदाधिकाऱ्यांकडूनही जगताप यांना कशाप्रकारे सहकार्य मिळते, याकडेही लक्ष लागले आहे.

कमबॅक झाले, पण दरारा दिसणार का?
बीड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सामान्य जिल्हाप्रमुखांना आमदार, मंत्री करण्याचा चमत्कार शिवसेनेत घडला. अनिल जगताप यांना शिवसेनेचा प्रदीर्घ अनुभव आहे. मात्र, पदावरून हटविल्यानंतर काही काळ ते पडद्यामागे होते, मात्र पक्षासोबत राहिले. त्यांचे आता कमबॅक झाले असले, तरी पूर्वीसारखा दरारा दिसणार का? अशी चर्चा आहे. संघटन वाढीसह पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे.

Web Title: again Anil Jagtap is appointed as Shiv Sena Beed district chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.