पुन्हा अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:00+5:302021-09-22T04:38:00+5:30
बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे ...
बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे सुरूच असून, आता पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
खरीप हंगातील सोयाबीन पिकाचा पेरा जवळपास २ लाख ८४ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला होता. दरम्यान, सोयाबीन पीक काढणीला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी १० ते १५ दिवसात सोयाबीन काढण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, २० ते २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या उत्पादनावर तसेच कापूस व इतर पिकांवरदेखील जास्तीच्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शासन व विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत होती. त्यानुसार जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसात नुकसानीचा पूर्ण अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार शासन स्तरावरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मदत केली जाणार आहे. मात्र, पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे पिकांचे नुकसान होणार असून, पुन्हा पंचनामे करण्याची गरज भासू शकते.
शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी
सोयाबीन काढणीला आलेले असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर तत्काळ काढणी करण्यात यावी. तसेच पावसाची शक्यता असल्यामुळे सोयाबीन भिजणार नाही याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी. ज्यांच्या काढणीला १० ते १५ दिवसाचा अवधी आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
७० टक्के पंचनामे पूर्ण
महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये आतापर्यंत ७० टक्के म्हणजेच ३ लाख ६० हजार १३८ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ४८ हजार ९२४ इतकी आहे.
पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर असून, येत्या दोन दिवसात शासनाकडे नुकसानीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे. हवामान बदलामुळे पिकांवरील धोका कायम असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या साहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. - बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड