जामिनावर बाहेर येताच पुन्हा लिंगनिदानाचा धंदा; बडतर्फ अंगणवाडीसेविका ताब्यात, डॉक्टर फरार
By सोमनाथ खताळ | Published: January 4, 2024 05:11 PM2024-01-04T17:11:53+5:302024-01-04T17:12:15+5:30
हा प्रकार आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास गेवराईतील संजयनगर भागात घडला.
बीड : दीड वर्षापूर्वी अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेल्या जालन्याच्या डॉक्टरसह गेवराईच्या बडतर्फ झालेल्या अंगणवाडी सेविकेने जामिनावर बाहेर येताच पुन्हा हा बाजार सुरू केला. याची तक्रार येताच पोलिस व आरोग्य विभागाने कारवाईसाठी सापळा लावला. एक महिलेला डमी रुग्ण बनवून तपासणीला पाठविण्यात आले. तपासणीला सुरुवात करताच यातील अंगणवाडी सेविका आणि घरमालकाला ताब्यात घेण्यात आले. परंतु, जालन्याच्या डॉक्टरने तेथून पळ काढला. हा प्रकार गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास गेवराईतील संजयनगर भागात घडला. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.
मनीषा शिवाजी सानप (वय ४०, रा. अर्धमसला, ता.गेवराई) व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव (वय ४५, रा. संतोषनगर, गेवराई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, जालन्याचा डॉ. सतीश गवारे हा फरार झाला आहे. गेवराईत अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याची तक्रार राज्याच्या आरोग्य विभागाकडे आली होती. त्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक बडे यांनी पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन सापळा लावण्याचे निश्चित केले. गुरुवारी सकाळी डमी रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यात आले. गेवराईतील एका घरात नेऊन तिची तपासणी सुरू केली. याच दरम्यान, अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिला पकडले. सोबतच बाहेर उभा असलेला घरमालक चंदनशिव यालाही दबा धरून बसलेल्या पथकाने पकडले. परंतु, डॉ. गवारे हा तेथून पळून गेला. या तिघांविरोधातही गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यांनी केली कारवाई
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहमंद नोमानी, डॉ.राजेश शिंदे, डॉ.गोपाळ रांदड, ॲड.निलेश जोशी, सुनिता शिंदे, राजु काळे, माने, गणेश नाईकनवरे, वखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एएचटीयूच्या सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, उपनिरीक्षक जगदीश मोरे, हवालदार पी.टी.चव्हाण, गणेश हंगे, नारायण कोरडे, सुनिल राठोड, चंद्रभागा मुळे, मनिषा राऊत, सतिश बहिरवाळ, विकास नेवडे, हेमा वाघमारे, रेखा गोरे, अनिता खरमाटे, सविता सोनवणे, प्रतिभा चाटे, कौशल्या ढाकणे आदींनी केली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी यासाठी मार्गदर्शन केले होते.