जमीन नावे करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना तलाठ्यासह एजंट एसीबीच्या जाळ्यात
By सोमनाथ खताळ | Published: November 30, 2023 08:04 PM2023-11-30T20:04:45+5:302023-11-30T20:05:20+5:30
लाच स्विकारताना तलाठ्यासह त्याच्या खासगी एजंटास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बेड्या ठोकल्या.
बीड : मुलीच्या नावे असलेली जमिन सुनेच्या नावे करण्यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिला होता. परंतू असे असतानाही पुढील कार्यवाही करण्यासाठी लाच मागितली. हीच २० हजार रूपयांची लाच स्विकारताना तलाठ्यासह त्याच्या खासगी एजंटास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरूवारी दुपारी पाटोदा तालुक्यातील वांजरा फाट्यावर करण्यात आली.
प्रवीण संदीपान शिंदे व विशाल ठाकरे (रा.सुप्पा, ता. पटोदा) असे आरोपींचे नाव आहेत. शिंदे हा सौताडा सज्जाचा तलाठी असून त्याच्याकडे वाहलीचाही अतिरिक्त पदभार आहे. आपले काम पाहण्यासाठी शिंदेने विशाल या खासगी इसमाला नियूक्त केले होते. यातीलच तक्रारदाराची सौताडा शिवारात सव्वा पाच एकर जमिन आहे. पाटोदा येथील दिवाणी न्यायालयाने प्रकरणामध्ये तडजोड करून ही जमिन तक्रारदाराच्या सुनेच्या नावावर करण्याचा आदेश दिला. याची अंमलबजावणी करण्यासाठी शिंदेकडे अर्ज दिला होता.
मुद्रांक शुल्क न भरता काम करून देण्याची हमी देत प्रविण शिंदे याने २० हजार रूपयांची मागणी केली. त्याला विशाल ठाकरे याने प्रोत्साहन दिले. हे दोघेही लाच घेण्यासाठी वांजरा फाटा येथे बोलावले. एका हॉटेलसमोर लाच स्विकारताच एसीबीने त्यांना पकडले. दोघांविरोधातही पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, गणेश मेहेत्रे आदींनी केली.