चोपनवाडीकरांचा रस्त्यासाठी आक्रमक पवित्रा; बीड-परळी महामार्गावर रास्तारोको, वाहतूक २ तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 04:21 PM2023-08-15T16:21:11+5:302023-08-15T16:21:46+5:30
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ते बीड-परळी महामार्ग या रस्त्याला मंजुरी मिळून जवळपास चार वर्ष उलटले. मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झाले नाही.
संतोष स्वामी
दिंद्रुड (बीड): माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी आज सकाळी नऊ वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत बीड-परळी महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, या भूमिकेत ठाम राहिल्याने प्रशासन हतबल झाले. रास्तारोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ते बीड-परळी महामार्ग या रस्त्याला मंजुरी मिळून जवळपास चार वर्ष उलटले. मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामस्थांना येत आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड-परळी महामार्ग ते चोपनवाडी या पावणे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामास चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. जवळपास एक कोटी तीस लाख रुपये मंजुर झाले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्रस्त आहेत. रस्त्या खराब असल्याने तीन किमी साठी जवळपास अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो.
सातत्याने पाठपुरावा करूनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी आज सकाळी बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात गावातील विद्यार्थ्यांसह महिला,वृद्ध यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. जवळपास दोन ते अडीच तास आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर शासकीय बांधकाम विभाग बीडचे कार्यकारी अभियंता फड यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी दिंद्रुड पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता.