बीडमध्ये मोर्चा ; गुन्हेगारांना फाशी द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:40 AM2018-04-18T00:40:54+5:302018-04-18T00:43:42+5:30
काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, राजस्थान, हरियाणासह महाराष्टÑात महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करत मंगळवारी शहरातील सर्व सामाजिक, राजकीय पक्ष आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने कलेक्टर कचेरीवर मूकमोर्चा धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, राजस्थान, हरियाणासह महाराष्टÑात महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करत मंगळवारी शहरातील सर्व सामाजिक, राजकीय पक्ष आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने कलेक्टर कचेरीवर मूकमोर्चा धडकला. त्यानंतर उपस्थित समुदायातून आरोपींना फाशी, फाशी फाशी असा एकच नारा घुमत होता. पक्ष आणि राजकीय झेंडे बाजुला सारत माणुसकीच्या झेंड्याखाली स्त्री अत्याचाराविरुद्ध बीडमध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच सर्वधर्मीय समाज एकवटला होता.
मागील चार दिवसांपासून मूकमोर्चासाठी सर्व पक्षीय तसेच सामाजिक संघटनांची तयारी सुरु होती. मंगळवारी सकाळी किल्ला मैदानापासून कमवाडा, बलभीम चौक, कारंजा, बशीरगंज, शिवाजी चौकमार्गे मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे सहभागी महिलांनी मोर्चा काढण्याचा उद्देश भाषणातून सांगितला.
जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्टÑ संघ व भारत सरकारने केलेल्या करारापैकी स्युडो कराराने स्त्रियांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारने घेतली आहे.
मात्र आज स्त्री अत्याचारात भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. राष्टÑीय अन्वेषण विभागाने देशात २०१६ मध्ये ३४ हजार ५२६ तर २०१७ मध्ये ३८ हजार ६९३ बलात्कार झाल्याचा अहवाल नोंदविला आहे. धार्मिक व जातीय द्वेषभावनेतून स्त्रीयांवरील सामुहिक अत्याचार, नग्न धिंड, खून असे अत्याचार घडत आहेत तर कोठे ते घडवून आणले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेक कोवळ्या मुली अत्याचाराच्या शिकार होत आहेत. राष्टÑीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा ललीता कुमारमंगलम यांनी राजीनामाबाबत केलेले विधान देशातील स्थिती दर्शविते, असेही निवेदनात नमूद केले आहे.
पाटोदा येथेही मंगळवारी मूक मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या मूक मोर्चात नगराध्यक्षा मनीषा पोटे, सतीश महाराज उरणकर, रामकृष्ण रंधवे महाराज, मौलाना अल्ताफ आदी मोर्चाच्या अग्रभागी होते. काळ्या फिती लावून लोक मूक मोर्चात सहभागी झाले. मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्वधर्मीय लोकांनी सहभाग नोंदवला. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. तहसीलदार रूपा चित्रक, पोनि माने यांनी पाच शाळकरी मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारले.
बलात्कारासारख्या गुन्ह्यात सहा महिन्यात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात संसदेने कायदा करावा. जिल्ह्यातील खासदारांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत माजी मंत्री सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केले.रामकृष्ण रंधवे महाराज, मौलाना अल्ताफ, सुरेखा खेडकर, सत्यभामा बांगर, राजाभाऊ देशमुख, आमीर साहब, एकबाल पेंटर यांची भाषणे झाली.
संवेदना जागविल्या
‘बचेगी बेटी तो पढेगी बेटी, तिला न्याय द्या, जस्टीस फॉर उन्नाव, देशद्रोहींना फाशी द्या, आदी घोषणांचे फलक मोर्चेक-यांच्या हाती होते. मोर्चात काळ्या रंगाचे फुगे आणि त्यावरील जस्टीस हा शब्द लक्ष वेधत होता. लहान मुलींच्या हाती असलेले ‘मीही निर्भयाची बहीण’ तसेच इतर संदेशफलक मानवी संवेदना जागृत करत न्यायाची मागणी करत होते.
महिलांचे शिष्टमंडळ
माजी आ.उषा दराडे, प्रा. सुशीला मोराळे, अॅड. करुणा टाकसाळ, अॅड. संगीता धसे, मनीषा तोकले, कुंदा काळे, अॅड. सय्यद असिमा पटेल, कमल निंबाळकर, प्रज्ञा खोसरे, अॅड. संगीता चव्हाण, प्रेमलता चांदणे, सविता शेटे, पुष्पा तुरुकमारे, शुभांगी कुलकर्णी, फरजाना शेख यांच्यासह ८ वर्षीय इकरा फातेमा आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना निवेदन दिले.
धारुरमध्ये कॅँडल मार्च
धारूर : अत्याचार झालेल्या बालिकेला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी रात्री नगरपालिका ते शिवाजी चौकमार्गे कॅँडल मार्च काढण्यात आला.
यावेळी राहुल सिरसट, सुनील गायसमुद्रे, मिथुन गायसमुद्रे, धम्मानंद गायसमुद्रे, सोनू सिरसट, सादेक इनामदार, शेक अक्रम, शेख फसी, अॅड. वाजेद, विजय शिनगारे, अतुल शिनगारे, ईश्वर खामकर, मोहन भोसले आदींसह युवक- युवती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियोजनासाठी बीड पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी बीड पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मोर्चेकºयांना वाहनाचा अडथळा ठरू नये, यासाठी वाहतूक नगर नाकामार्गे वळविण्यात आली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि नानासाहेब लाकाळ, एस.बडे, सय्यद सुलेमान यांच्यासह अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर होते.