कृषी महाविद्यालय परिसर पर्यावरणप्रेमींसाठी आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:47+5:302021-08-21T04:37:47+5:30
अंबेजोगाई : कृषी महाविद्यालयाचा परिसर साहित्यिक, कलाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तींसाठी हा परिसर ...
अंबेजोगाई : कृषी महाविद्यालयाचा परिसर साहित्यिक, कलाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तींसाठी हा परिसर ऊर्जेचा स्रोत बनत चालला आहे, असे गौरवोद्गार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी काढले.
येथील कृषी महाविद्यालयात ‘मियावाकी’ या जपानी तंत्रज्ञानावर आधारित ‘अटल आनंद घनवन’ या वृक्षलागवड प्रकल्पाचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.अशोक ढवण होते. व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, माजी कार्यकारी परिषद सदस्य राहुल सोनवणे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाजवादक पं.उद्धवराव आपेगावकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, डॉ.बाबासाहेब गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ.अशोक ढवण म्हणाले की, अंबेजोगाई येथील कृषी महाविद्यालयाचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या कार्याव्यतिरिक्त महाविद्यालयाने प्रक्षेत्र व परिसर अत्यंत रमणीय आणि नेत्रसुखद असा बनविल्याचे ते म्हणाले.
संपूर्ण परिसर प्लास्टीकमुक्त, तणमुक्त व कचरामुक्त व सुंदर झालेला पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. संचालन डॉ.सुहास जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ.प्रताप नाळवंडीकर यांनी मानले.
शिवार फेरीतून पाहणी
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षारोपण करून, शिवार फेरीत कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लिली, मोगरा, गुलाब, निशिगंध इत्यादी फुलांनी विकसित केलेले उद्यान, ‘आनंद अटल घनवन’, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह व परिसरात लागवड केलेल्या १०० विविध प्रजातींच्या १५,००० विविध वृक्षांची, त्यात प्रामुख्याने आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, कडुनिंब, उंबर, गुलमोहर, चिंच आदी झाडांची मान्यवरांनी पाहणी केली.
190821\4021dsc_3873_1.jpg
कुलगुरू च्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले