बनावट कागदपत्राच्या आधारे हडपली शेतजमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:58+5:302021-03-25T04:31:58+5:30
बीड: बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पारगाव जप्ती येथील एका शेतकऱ्याच्या ...
बीड: बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पारगाव जप्ती येथील एका शेतकऱ्याच्या २ हेक्टर ४३ आर एकर जमिनीवर बनावट दस्ताऐवजाद्वारे कब्जा करुन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम खटोडसह पाच जणांवर बीड ग्रामीण ठाण्यात २३ मार्च २१ रोजी गुन्हा नोंद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, पारगाव (जप्ती) येथील अनंत कडाजी तिपाले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पारगाव (जप्ती) येथील गट क्र.६२ मध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. ७ मे १९८५ रोजी त्यांनी चुलत्याकडून १९ एकरपैकी १० एकर चार गुंठे जमीन खरेदी केली होती. खरेदी खतामध्ये दक्षिणेकडील जमीन खरेदी करत असल्याची नोंद आहे. सातबारा उताऱ्यावर तसे नमूद आहे. दरम्यान, चुलते मयत झाल्यानंतर गट क्र ६२ मधील ९ एकर जमीन चुलतभावाने विक्री केली. त्यानंतर खरेदीदाराने २ एप्रिल १९९३ रोजी २ एकर ४३ आर जमीन झुंबरलाल पन्नालाल खटोड यांना विक्री केली होती. दरम्यान, झुंबरलाल खटोड यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र गौतम झुंबरलाल खटोड यांनी मूळ खरेदीदारांशी संगनमत करुन बनावट चतुसीमा व खरेदीखत तयार करुन दुरुस्तीपत्र केले व फसवणूक केली. यासंदर्भात अनंत तिपाले यांच्या फिर्यादवरुन गौतम झुंबरलाल खटोड, रतनलाल पन्नालाल नहार व इतर तिघांवर बीड ग्रामीण ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे तपास करत आहेत.
.....
यापूर्वी झाला असाच एक गुन्हा दाखल
बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी बीड ग्रामीण ठाण्यातही अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. बीड शहर ठाण्यातील दोन आरोपींचा बीड ग्रामीण ठाण्यातील गुन्ह्यातही समावेश आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांचे आधारावर जमिनीची खरेदी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
.....