हजारो शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याची कृषी आयुक्तांची कबुली; शिरापूर अनुदान वाटपाची चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:54+5:302021-02-12T04:31:54+5:30
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, बीड जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख, बंडूआप्पा देवकर, विजय आटोळे, कृष्णा जगताप, राधाकिशन ...
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, बीड जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख, बंडूआप्पा देवकर, विजय आटोळे, कृष्णा जगताप, राधाकिशन गडदे यांच्यासमवेत दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी कृषी आयुक्तालय, पुणे येथे बीड जिल्ह्यातील २०१८च्या सोयाबीन पीकविमा नुकसानभरपाई बाबत बैठक झाली. त्यावेळी कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी ही वस्तुस्थिती स्पष्ट करून कारवाईचे आश्वासन दिले.
आष्टी तालुक्यातील धानोरा महसूल मंडळातील २०१९चा हवामान आधारित डाळिंब फळ पीकविमा नुकसानभरपाईबाबत लवकरच निर्णय करण्यात येईल. अति पावसामुळे २०२० खरिपात ७२ तासांत नुकसानभरपाईसाठी ऑनलाइन न केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिवृष्टीचे अनुदान दिलेले आहे. तेच निकष गृहित धरून विमा कंपनीने नुकसानभरपाई द्यावी. यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधीसोबत बैठक करून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळवून देऊ, असे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी आश्वासन दिले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळ पिकासाठी ठाकरे सरकारने हेक्टरी १८ हजार रुपये अनुदान दिले. मात्र आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील शेतकऱ्यांना केवळ नऊ हजार रुपये अनुदान वाटप केले. याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिले.