समृद्ध शेतीसाठी कृषी प्रदर्शन आवश्यक - नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:11 AM2018-12-10T00:11:07+5:302018-12-10T00:11:29+5:30
कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खा.नाना पटोले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत असतो. असे प्रयोग अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे येतात. त्यामुळे कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खा.नाना पटोले यांनी केले.
येथील दसरा मैदानावर ६ डिसेंबर पासून स्व. कृषीरत्न गणेशराव बेदरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासन कृषी, पणन विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी शेतकरी युवती संघटनेच्या पूजा मोरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, सत्संग मुंडे, दादासाहेब मुंडे, अॅड.सुरेश हात्ते, काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, महादेव धांडे, सुनील नागरगोजे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकऱ्याने शेती केली पाहिजे. त्याचबरोबर शेतक-यांच्या घामाला व त्याच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यांचा स्वाभिमान जगला पाहिजे अशी भूमिका आपण काँग्रेसच्या माध्यमातून उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कृषी प्रदर्शनातून शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे फायदे होत असताना अशा कृषी आयोजकांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांचे अनुदान बंद करत आहे. हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडणारे असून उपाययोजना मात्र शून्य असल्याने जनतेतून सरकारविरोधात प्रचंड संताप आहे असे पटोले यांनी सांगितले.
याप्रसंगी पूजा मोरे, अमर खानापुरे यांची देखील भाषणे झाली.
दरम्यान कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया गिरीश थावरे, विष्णू जायभाये, इंजि. पी. आर. देशमुख, राजेंद्र जाधव, गोकुळ मेघारे, आतिष गरड, सीताराम मस्के आदी शेतक-यांचा स्व.गणेशराव बेदरे कृषीरत्न पुरस्कार खा. नाना पटोले व मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक महेश बेदरे यांनी केले. सूत्रसंचालन महादेव चाटे यांनी केले.
भाजप शेतकरीविरोधी : पटोले
भाजप सरकार हे घात करणारे असून, यांनी पक्षात एकनाथ खडसे यांचा घात केला. तसेच स्व.गोपीनाथ मुंडे यांचा देखील यांनीच घात केल्याची टीका खा. नाना पटोले यांनी केली. तसेच शेतक-यांसाठी काम करणारे, त्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडणारे हे सरकारचे दुश्मन आहेत. सत्तेत आल्यानंतर शेतक-यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना, शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याऐवजी शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार घेत आहे. यामुळे मी माझा खासदारकीचा राजीनामा फेकला, असे ते म्हणाले. शेतकरी विरोधी धोरणामुळे कृषी प्रधान देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी हिताच्या अनेक योजना बंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. त्यामुळे स्व. गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते नक्कीच माझ्यासोबत राहिले असते, असे सांगतानाच बाकी का राहत नाहीत, असा प्रश्न खा.पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.