Agriculture News: गोगलगायीनंतर यलो मोझॅकने वाढविली चिंता, सोयाबीनवर खोडमाशी, चक्री भुंग्याचाही प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 18:31 IST2022-08-09T18:30:48+5:302022-08-09T18:31:10+5:30
Agriculture News: आधी शंखी गोगलगायीने त्रस्त केल्यानंतर आता ‘यलो मोझॅक’ नामक व्हायरस तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये पसरू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे.

Agriculture News: गोगलगायीनंतर यलो मोझॅकने वाढविली चिंता, सोयाबीनवर खोडमाशी, चक्री भुंग्याचाही प्रादुर्भाव
बीड : आधी शंखी गोगलगायीने त्रस्त केल्यानंतर आता ‘यलो मोझॅक’ नामक व्हायरस तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये पसरू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव, वरपगाव, श्रीपतरायवाडी तसेच अन्य परिसरात हा प्रादुर्भाव दिसून आला असून मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान विभागाच्या सूचनेनुसार कृषी अधिकारी शेतात पाहणी करून मार्गदर्शन करणार आहेत. ‘यलो मोझॅक’ मुळे सोयाबीनच्या उत्पादनाला काही प्रमाणात फटका बसू शकतो, असे मानले जात आहे.
सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे पट्टे दिसत आहेत. तर परिपक्व झालेली पाने तांबूस दिसत आहे. काही ठिकाणी पूर्ण झाड पिवळे पडत आहे. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लगडतात त्यामुळे उत्पन्नात घट होऊ शकते. या प्रादुर्भावामुळे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारण्यांवर खर्च करावा लागत असून चिकट सापळे लावले जात आहेत.
हंगामाआधी लागवड
अंबाजोगाई तालुक्यात आढळून आलेल्या यलो मोझॅक प्रादुर्भावग्रस्त सोयाबीनची लागवड खरीप हंगामाच्या आधी केल्याचा हा परिणाम मानला जात आहे. त्यामुळे बिगरहंगामी सोयाबीनची लागवड टाळल्यास असा धोका टाळता येऊ शकतो, असा सल्ला दिला जात आहे. नियंत्रणासाठी आवश्यक औषधी आणि कीटकनाशके कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारण्याचा सल्ला दिला जात आहे.
का पसरतोय व्हायरस? काय आहे उपाय
यलो मोझॅक हा व्हायरस बियाण्यातील दोष तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य कमी झाल्याने पसरण्याचा धोका असतो. बियाणे कच्चे असेल तर असा प्रादुर्भाव होऊ शकतो.तसे दिसताच सूक्ष्म अन्नद्रव्याची एक फवारणी करावी फरक न पडल्यास पिवळसर झाडे उपटून फेकून देणे हाच त्यावर पर्याय असल्याचे कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले. तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंगा आण बुरशीवर ताबडतोब नियंत्रण करणे आवश्यक आहे.
कपाशीवर मावा, तुडतुडे कापसातही मावा, तुडतुड्यांच प्रादुर्भाव असून त्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या करावे असे आवाहन करण्यात आले आहे.