खुर्चीला हार घालून कृषी अधिका-यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:09+5:302021-06-10T04:23:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील तालुका कृषी अधिका-यांंना हाताशी धरून येथील व्यापारी खते, बी-बियाणे जादा दराने विकून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील तालुका कृषी अधिका-यांंना हाताशी धरून येथील व्यापारी खते, बी-बियाणे जादा दराने विकून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. याच्या निषेधार्थ शेकापच्यावतीने बुधवारी येथील कृषी कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन केले. यावेळी कृषी अधिका-यांच्या खुर्चीला हार घालत निषेध व्यक्त केला.
माजलगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी एक आठवड्यापासून येथील मोंढ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. याचा फायदा उचलत कृत्रिम टंचाई करीत येथील व्यापारी बी-बियाणे व खते जादा दराने विक्री करीत आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेने तक्रारी केल्या. तरीही कृषी अधिकारी व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत.
याचा निषेध म्हणून शेकापचे नेते ॲड. भाई नारायण गोले यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन केले.
यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याच्या निषेधार्थ म्हणून त्यांच्या खुर्चीला हार घालत निषेध केला. यापुढे व्यापा-यांनी शेतकऱ्यांची लूट थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा नारायण गोले यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये लहू सोळंके, राजेभाऊ जाधव, परमेश्वर डाके, राजेश डाके, रंजीत जाधव, अशोक भांगे, मुंजा पांचाळ, समाधान पोळ यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
090621\img_20210609_125242_14.jpg
===Caption===
बियाणे, खतांचा काळाबाजार रोखून शेतक-यांची लूट थांबवावी, या मागणीसाठी शेकापच्या वतीने माजलगाव येथे कृषी अधिका-यांच्या खुर्चीला हार घालून निषेध करताना कार्यकर्ते.