स्वप्नपूर्ती दृष्टीक्षेपात, अहमदनगर-आष्टी हायस्पीड रेल्वे १७ डिसेंबरला धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 02:05 PM2021-12-14T14:05:18+5:302021-12-14T14:10:02+5:30
Beed Railway: दोन वेळाच्या इंजिन चाचणीनंतर आता नगर ते आष्टी अशी १७ डिसेंबरला हायस्पीड रेल्वे धावणार
कडा(जि.बीड) : गेल्या २७ वर्षांपासून रखडलेल्या बीड जिल्हावासीयांचा (Beed Railway) जिव्हाळ्याचा रेल्वे प्रश्न आता कुठेतरी मार्गी लागणार असल्याचे संकेत निर्माण झाल्याचे चित्र प्रत्यक्षात पहावयास मिळत आहेत. दोन वेळाच्या इंजिन चाचणीनंतर आता नगर ते आष्टी अशी १७ डिसेंबरला हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रेल्वे मार्गाच्या झालेल्या कामाचे उद्घाटन देखील होणार आहे.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नगर ते आष्टी या मार्गावर रेल्वे इंजिन चाचणीसाठी फिरत होते, पण रेल्वे कधी धावणार? अशी उत्सुकता सर्वांना असताना आता मुहूर्त ठरला आहे. हायस्पीड रेल्वे येत्या १७ डिसेंबरला अहमदनगर ते आष्टी अशी धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
वरिष्ठ अधिकारी मुंबईवरून सोलापूरवाडीत येणार
रेल्वे सुरक्षा आयोगाचे मनोज अरोरा, मुख्य अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता (बांधकाम नगर), विजयकुमार राय, सोलापूरचे चंद्रभागा सिंग, अहमदनगर येथील रेल्वे अधिकारी एस. सुरेश यांच्या उपस्थितीत सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर झालेल्या कामाचे उद्घाटन होणार आहे.