पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी हवा लोकसहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:35 AM2021-02-20T05:35:54+5:302021-02-20T05:35:54+5:30
शिरूर कासार : तालुक्यातील आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी ५२ ग्रामपंचायतींसह सर्वांचा लोकवाटा अपेक्षित असून, सरपंच व ग्रामसेवकांना लोकवाट्यासाठी ...
शिरूर कासार : तालुक्यातील आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी ५२ ग्रामपंचायतींसह सर्वांचा लोकवाटा अपेक्षित असून, सरपंच व ग्रामसेवकांना लोकवाट्यासाठी साकडे घालणारे लेखी पत्र या विभागामार्फत देण्यात आले आहे. शिरूर येथील श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची रंगरंगोटी करीत जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सूचनेनुसार ‘सुंदर माझे कार्यालय, माझा गाव सुंदर गाव’ हे अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्याच्या सूचना आहेत. ही सर्व कामे लोकवाट्यातून करायची आहेत. यासाठी स्वतंत्र असा निधी नसल्याने आपापल्या दवाखान्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतीने सहकार्याच्या भावनेतून वित्त आयोग, ग्रामपंचायत निधी अथवा अन्य मार्गाने या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहे.
कायापालट अभियानातून इमारत रंगरंगोटी, शासकीय योजना माहितीफलक, पशुपालकांसाठी ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, गरजेपुरते फर्निचर, दवाखान्यात नळ कनेक्शन व शौचालय सुविधा, पशुवैद्यकीय सेवेसाठी अद्ययावत उपकरण खरेदी, मूलभूत सुविधा आणि दवाखान्याचे सुशोभीकरण अपेक्षित आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत,पशुपालक तसेच पशुप्रेमींनी या अभियानात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभागाला आशा
तालुक्यात शिरूरसह रायमोह, घाटशिळ पारगाव, ब्रह्मनाथ, वेळंब, खालापुरी, पिंपळनेर, जाटनांदूर आणि मानूर असे आठ दवाखाने असून, या सर्वांचा कायापालट खर्च जवळपास अडीच ते तीन लाखांपर्यंत लागणार आहे. यासाठी लोकवाटा हा महत्त्वपूर्ण ठरणार असून, तो मिळेल असा आशावाद पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.