मद्यपी लिपिकाचा बीड जिल्हा रूग्णालयात धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:15 AM2019-04-03T00:15:58+5:302019-04-03T00:16:28+5:30
मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसून बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपिक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपिकाने चांगलाच धिंगाणा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसून बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपिक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपिकाने चांगलाच धिंगाणा घातला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद नव्हती.
शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा येथील एक व्यक्ती आपल्या आईला घेऊन जिल्हा रूग्णालयात आला होता. तपासणी झाल्यानंतर ते परत निघाले. याचवेळी एक तरूण त्यांना दुचाकीला चावी लावताना दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्याला पकडून पोलीस चौकीत नेले. हा चोर असावा, असा संशय त्यांचा होता. मात्र येथे चौकशी केली असता तो दारूच्या नशेत तर्रर्र असल्याचे समजले. शिवाय तो बीडमधीलच एका नामांकित महाविद्यालयात लिपिक या पदावर कार्यरत होता.
मंगळवारी सुटी मारून तो मद्यपान करून इतरत्र फिरत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित दुचाकी मालकालाही हा चोर नसल्याची खात्री पटल्यावर त्याने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी या तरूणाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
महाविद्यालय प्रशासनाची धावपळ
हा तरूण दारू पिण्याच्या सवयीचा आहे. याच सवयीमुळे त्याच्यावर यापुर्वीही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तो मंगळवारी महाविद्यालयात आलाच नसल्याचे सांगितले. दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून कारवाई करणार असल्याचे म्हटले.