शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पक्षीय एकजूट; गेवराईत तहसीलवर धडकला संताप मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 06:08 PM2021-10-14T18:08:20+5:302021-10-14T18:08:39+5:30
अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई, रस्ते, पाझर तलाव,बंधाऱ्यांची दुरुस्ती यासह इतर मागण्यांसाठी संताप मोर्चा
गेवराई : अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई, रस्ते, पाझर तलाव,बंधाऱ्यांची दुरुस्ती यासह इतर मागण्यांसाठी आज दुपारी १२ वाजता आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर सर्व पक्षीय संताप मोर्चा काढण्यात आला.
तालुक्यात गेल्या महिन्यात पाच ते सहा वेळा अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तालुक्यातील अनेक पाझर तलाव,बंधारे फुटुन गेले त्याची दुरूस्ती करावी, रस्त्याची व पुलाची वाताहात झाली त्यांची दुरूस्ती करावी, बॅकेची कर्ज वसुली थांबवावी, एफआरपीचे पैसे देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी आज दुपारी आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतक-याच्या न्याय हक्कासाठी सर्व पक्षीय संताप मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा शहरातील कोल्हेर रोडपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, माळी गल्ली, बेदरे गल्ली, मेन रोड, चिंतेश्वर गल्ली मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात आ.लक्ष्मण पवार,अॅड.सुरेश हात्ते,मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, प्रा.शाम कुंड,जे.डी शाह, करण जाधव, फेरोज अहमद,मुन्ना मोझम, यहिया खान, लक्ष्मण चव्हाण यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.