बीड जिल्ह्यात १० हजार बुद्धमूर्तींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:15 AM2018-04-25T01:15:34+5:302018-04-25T01:15:34+5:30
बुद्धधम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी येत्या बुद्धजयंतीपासून बीड जिल्ह्यात महाअभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘गाव तिथे बुद्ध विहार आणि घर तिथे बुद्धमुर्ती’ ही संकल्पना ठेवून पहिल्या टप्प्यात जिल्हाभरात दहा हजार बुद्धमूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बुद्धधम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी येत्या बुद्धजयंतीपासून बीड जिल्ह्यात महाअभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘गाव तिथे बुद्ध विहार आणि घर तिथे बुद्धमुर्ती’ ही संकल्पना ठेवून पहिल्या टप्प्यात जिल्हाभरात दहा हजार बुद्धमूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे.
३० एप्रिल रोजी बीड शहरातील पंचशीलनगर भागातील बुद्ध विहारात सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या अभियानांतर्गत पहिल्या बुद्धमूर्तीचे वाटप करण्यात येणार आहे. या महाधम्म अभियान सोहळ्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
बीड येथील सिद्धीविनायक कॉम्पलेक्स भागात संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या महाधम्म अभियानासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भन्तेजी व धम्मसेवकांच्या उपस्थितीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
महाधम्म अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने आपले योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने समाज बांधवांना करण्यात आले आहे.
धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी विविध कार्यक्रम
बीड जिल्ह्यात धम्मचळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी महाधम्म अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावात बुद्धविहार, समाज मंदिराची उभारणी करण्यासाठी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
प्रत्येक समाज बांधवांच्या घरात बुद्धमूर्ती असावी व आहेत ती बुद्धविहारे धम्मकेंद्र बनावीत, असा यामागील प्रमुख उद्देश आहे. या महाधम्म अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी बौद्ध धम्म परिषदा, श्रामनेर शिबीर, धम्म स्पर्धा, धम्मदेसना आदि कार्यक्र म घेण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी संयोजन समितीतर्फे सर्व तयारी करण्यात आली असून, त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या निमित्त होणाऱ्या सर्व विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर झाली.