लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीस मुभा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:19+5:302021-05-16T04:33:19+5:30
बीड : बीड जिल्ह्यातील खते, बी-बियाणे विक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी ...
बीड : बीड जिल्ह्यातील खते, बी-बियाणे विक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली आहे.
यावर्षी पावसाळी हंगाम हा चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद, मूग आदी पिकांची लागवड होणार असून जूनमध्ये वेळेवर पाऊस पडेल असा अंदाज आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते खरेदीसाठी बीड जिल्ह्यातील खतांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत उघडी ठेवणे गरजेचे असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी सवलतीची वेळ मिळावी, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कृषी दुकाने किमान चार तास उघडण्यासाठी परवानगी प्रशासनाने द्यावी. खरीप हंगामाचा कालावधी पाहता पेरणीचा काळ हा जवळ आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी देखील माजी मंत्री क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.