भटकंतीसोबतच बियाणांची टोभणीही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:16+5:302021-06-10T04:23:16+5:30
अंबाजोगाई : निसर्गाच्या सानिध्यात दररोज फिरताना विविध बिया टोभण्याचे काम निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने सुरू आहे. या ग्रुपने अंबाजोगाई व ...
अंबाजोगाई : निसर्गाच्या सानिध्यात दररोज फिरताना विविध बिया टोभण्याचे काम निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने सुरू आहे. या ग्रुपने अंबाजोगाई व परिसरात विविध प्रकारच्या शेकडो बिया टोभल्या आहेत.
अंबाजोगाईचा परिसर डोंगरदऱ्या व नद्या, ओढ्यांनी वेढलेला आहे. शहरालगत मुकुंदराज समाधी परिसर, संतकवी दासोपंत समाधी परिसर, रेणुकादेवी परिसर, बुट्टेनाथ मंदिर, नागनाथ मंदिर परिसर, मांडवा रोड व नागझरी परिसर हा भाग निसर्गरम्य व पर्यटन केंद्र आहे. या परिसरात बहुतांश ठिकाणी पाण्याची ही मोठी उपलब्धता आहे. शहरातील महिला व नागरिक शुद्ध हवा व ऑक्सिजन पार्क म्हणून या ठिकाणांकडे मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणावर जातात. हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वन विभागानेही या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केलेली आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या निसर्गरम्य वातावरणात फिरणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
येथील निसर्गप्रेमी ग्रुपचे प्रशांत आदनाक, विनोद पोखरकर, संजय साळवे, बालाजी शेरेकर, गणेश काळे, प्रमोद पोखरकर, मनीष रुपडा, गणेश राऊत, सिद्राम जळकोटे, हरीश वाघमारे ही युवक मंडळी निसर्गाच्या सानिध्यात भटकंतीचा आनंद घेत या परिसरातील डोंगर माथ्यावर व परिसरात विविध झाडांच्या बिया टोभत आहे. हा उपक्रम गेल्या तीन आठवड्यांपासून सुरूच आहे. यात प्रामुख्याने सीताफळ, बोर, जांभळ, बाभूळ, चिंच, लिंबोनी अशा विविध प्रकारच्या बिया वर्षभर जमवून त्या पावसाळ्याच्या तोंडावर लावल्या जातात. शेकडो बिया टोभण्यात आल्याने व या दोन आठवड्यांत पाऊस सातत्याने पडत असल्याने बिया मोठ्या प्रमाणात उगवल्या आहेत. या उपक्रमामुळे या परिसरात नवीन शेकडो वृक्षांची लागवड सुरू झाल्याने हा परिसर निसर्गरम्य होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे.
===Photopath===
090621\fb_img_1622398862570_14.jpg~090621\fb_img_1622398694347_14.jpg