अधिक मोबदला मिळविण्यासाठी कोर्ट निकालातील बदलली पाने; बीडमधील खळबळजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:54 AM2023-12-26T05:54:01+5:302023-12-26T05:55:22+5:30

अधीक्षकांची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल

altered pages of court judgment to obtain more compensation in beed | अधिक मोबदला मिळविण्यासाठी कोर्ट निकालातील बदलली पाने; बीडमधील खळबळजनक प्रकार

अधिक मोबदला मिळविण्यासाठी कोर्ट निकालातील बदलली पाने; बीडमधील खळबळजनक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क, बीडMarathi News ): मावेजाच्या प्रकरणात २०१६ साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला. परंतु, नंतर यातील सहा पानेच बदलण्यात आली. हा प्रकार २०१६ ते २०२२ या काळात घडला. सहायक सरकारी वकील यांना समजताच त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  चक्क न्यायालयाचा निकालच बदलल्याने खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा तक्रारदाराला भूसंपादन अधिकाऱ्यांनी मावेजा मंजूर केला होता. नुकसान भरपाईच्या नाराजीने वाढीव मावेजा मिळावा, यासाठी पाच प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार २ जुलै २०१६ रोजी तत्कालीन सहदिवाणी न्या. व स्तर न्या. साजिद आरेफ सय्यद यांनी ही प्रकरणे निकाली काढली.

पाने बदलणारे कोण?

न्यायालयाच्या निकालात फेरफार करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. सामान्य व्यक्ती अशी हिंमत करू शकत नाही. यात न्यायालयातीलच काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता पोलिस तपास करत आहेत. हा निकाल बदलण्यासाठी आर्थिक उलाढाल झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे झाला उलगडा  

निकालाच्या प्रतीचा कागद हा जाड असतो. यामध्ये वाढीव मावेजाची रक्कमही लिहिण्यात आली होती. परंतु, नंतर सहायक सरकारी वकिलांनी या प्रकरणातील प्रमाणित प्रतींची मागणी केली. त्यानंतर या निर्णयातील पान क्रमांक ९, १०, १७, १९, २० व २५ हे बदलल्याचे दिसले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र पाठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमचे कलम ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ नुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.
 

Web Title: altered pages of court judgment to obtain more compensation in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड