गेवराई-माजलगाव रस्त्यावरील पर्यायी पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:45+5:302021-08-25T04:38:45+5:30
राजेश राजगुरू/ लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : गेवराई-माजलगाव या रस्त्यावरील गोळेगावजवळील पर्यायी पूल नदीला पूर आल्याने वाहून गेला ...
राजेश राजगुरू/
लोकमत न्यूज नेटवर्क
तलवाडा
: गेवराई-माजलगाव या रस्त्यावरील गोळेगावजवळील पर्यायी पूल नदीला पूर आल्याने वाहून गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी दिवसभर बंद झाली होती. कंत्राटदाराकडून पूल पूर्ववत करण्याचे काम चालू आहे.
बागपिंपळगाव ते सावरगाव या राज्यमार्ग-५० रस्त्याचे काम सुरू आहे. जवळपास १५० कोटी रुपये निधी असलेल्या या रस्त्यावर असलेल्या नदी-नाल्यांवरील पुलांचेही बांधकाम सुरू आहे. गोळेगाव येथील शिंगरी नाल्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने या नाल्यावर नळ्या टाकून पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती. या पुलावरून वाहतूक सुरू होती.
पण सोमवारी रात्री तालुक्यात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे गोळेगावजवळील नदीला पूर आला होता. या पुरात या रस्त्यावर बनवलेला पर्यायी पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी दिवसभर बंदच होती. महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते; पण दिवसभर पर्यायी पुलाचे काम चालू असल्याने वाहतूक बंदच होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊन वाहतूकदारांचा गोंधळ उडाला होता. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील राजापूरजवळील पूलही अशाच पद्धतीने पावसात वाहून गेला होता. त्यावेळीही दोन दिवस वाहतूक बंदच होती. त्याचाही पोलिसांना त्रास झाला होता.
.....
शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतीचे नुकसान
पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी नळ्या टाकून पर्यायी पूल बनवण्यात आला होता. यासाठी नळ्यावर माती व मुरमाचा भराव करून रस्ता केलेला होता. नदीला आलेला पूर भरावामुळे अडला गेल्याने ते पाणी शेजारील शेतात घुसले. यामुळे या शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचेही नुकसान झाले आहे.
....