आष्टी तालुक्यात बर्ड फ्लूची लागण नसली तरी कोंबड्यांचे मृत्युसत्र थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:02 AM2021-02-06T05:02:15+5:302021-02-06T05:02:15+5:30
कडा : आष्टी तालुक्यात बर्ड फ्यूची लागण सुरू झाली असून ब्रम्हगांवसह शिरापूर येथे देखील कोंबड्या दगावल्याची घटना घडली होती. ...
कडा : आष्टी तालुक्यात बर्ड फ्यूची लागण सुरू झाली असून ब्रम्हगांवसह शिरापूर येथे देखील कोंबड्या दगावल्याची घटना घडली होती. याला प्रतिबंध घालण्यासाठी आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्यांच्या सुरक्षेसाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली असून प्रत्येक पथकात चार लोकांचा सहभाग आहे. कुठे मृत पक्षी अथवा कोंबड्या आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाला कळविण्याचे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी केले आहे
तालुक्यात बर्ड फ्लूची लागण नसली तरी कोंबड्याचे मृत्युसत्र थांबत नसल्याने नेमक्या कोंबड्या मरतात तरी कशाने अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आष्टी तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी कार्यालयात १९ व्या पशु गणनेनुसार ३ लाख ६६ हजार ५८१ एवढी कोंबड्यांची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले असून कोंबड्यांचे शेड देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या केलेल्या या व्यवसायाला आता कठीण दिवस आलेत. काही दिवसांपूर्वीच शेजारील पाटोदा तालुक्यात बर्ड फ्यूची लागण झाल्याने कावळ्यांचे मृत्यु झाले.
त्याच बरोबर तालुक्यातील ब्रम्हगांव, शिरापूर, सराटेवडगांव ,धानोरा, पिंपरखेड, खिळद, पाटण, केरूळ येथेही पक्ष्यांसह कोंबड्यांचा मुत्यू झाला. प्रशासनाने गंभीर दखल घेत याच धर्तीवर अशा घटना कुठे घडल्या की लगेच पाहणी व निदानासाठी पंचनामा करून पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक पशुधन विकास अधिकारी, तीन सहाय्यक परिचर अशी टीम सक्रिय केली आहे. पण आजवर मृत पक्षी व कोंबड्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून बर्ड फ्लूची लागण अथवा त्याने मृत्यु झालेला नसला तरी तालुक्यात कोंबड्याचे मृत्युसत्र सुरूच असल्याने व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की तालुक्यात बर्ड फ्लूची लागण झालेला अद्याप एकही अहवाल आला नसून कोंबड्यांना या दिवसात हागवण हा साथीचा रोग असून आणि कोंबड्यांना वेळेवर खाद्य मिळत नसल्याने मृत्यू होत असल्याचे त्यानी ‘लोकमत’ला सांगितले.