अंबाजोगाई परिसरात बिबट्या मुक्कामी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:28 AM2018-12-07T00:28:09+5:302018-12-07T00:28:18+5:30
बरोबर एक महिन्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई नजीकच्या परिसरातील दोन वासरांचा फडशा पाडल्याने बिबट्याचा या परिसरातील मुक्काम वाढल्याचे सिद्ध झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : बरोबर एक महिन्यानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई नजीकच्या परिसरातील दोन वासरांचा फडशा पाडल्याने बिबट्याचा या परिसरातील मुक्काम वाढल्याचे सिद्ध झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा बिबट्याने बुट्टेनाथ परिसरात बाबू गवळी या शेतकऱ्याची गोठ्यात बांधलेली दोन वासरे ठार मारली. एक महिन्यापूर्वी याच परिसरात दोन वासरांना बिबट्याने ठार मारले होते.
अंबाजोगाईच्या आजूबाजूंच्या जंगलाच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. काही वेळेस हा बिबट्या नागरिकांनीही पाहिला आहे. मागील महिन्यातच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर अदृश्य झालेला बिबट्या थेट बुधवारी रात्री प्रकटला. बुट्टेनाथ परिसरात वान नदी शेजारी गट क्र. ६३६ मध्ये बाबू जुम्मा गवळी यांची शेती आणि गोठा आहे. त्यांनी गोठ्यात बांधलेली दोन वासरे बिबट्याने बुधवारी रात्री फस्त केली. गुरुवारी सकाळी बाबू गवळी यांना झालेली घटना समजली आणि त्यांनी वन विभागास याबाबत माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी शंकर वरवडे, नागरगोजे आणि शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. वन अधिका-यांनी जनावरांच्या अंगावरील जखमा आणि ठसे पाहून हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या घटनेमुळे बिबट्या फिरून फिरून पुन्हा याच परिसरात येत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतक-यांत दहशत पसरली असून वनविभागाने तात्काळ येथे पिंजरा लावून या बिबटयाला जेरबंद करण्याची मागणी येथील शेतकरी करत आहेत. तसेच, मृत जनावरांची नुकसानभरपाई देण्याची मागणी बाबू गवळी यांनी केली आहे.