अंबाजोगाईत रुग्णवाहिका चालकावर प्राणघातक हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:43 PM2019-01-14T17:43:38+5:302019-01-14T17:44:33+5:30
आठ जणांनी कोयता आणि चाकूच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला.
अंबाजोगाई (बीड ) : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील खाजगी रुग्णवाहिकांचे मालक तथा चालक निकेश सुंदरराव जगदाळे (वय ३१) यांच्यावर आठ जणांनी कोयता आणि चाकूच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात निकेश जगदाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
निकेश जगदाळे यांचा रुग्णवाहिकेचा व्यवसाय आहे. गुरुवारी त्यांचा क्रांतीनगर भागात राहणाऱ्या शेख बाबा याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. परंतु, दोघांनीही हा वाद आपसात मिटवून घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता निकेश आणि त्यांचा मित्र गणेश सोळंके दुचाकीवरून जात असताना स्वाराती परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य चौकात त्यांना बाबूलाल शेख याने आवाज देऊन थांबविले. यावेळी तिथे थांबलेल्या बाबूलाल शेख, संतोष चव्हाण, इम्रान शेख, अतुल पवार, दत्ता भुजंगे, शेख बाबा आणि अन्य दोघांनी आदल्या दिवशी शेख बाबा याच्यासोबत झालेल्या वादाची कुरापत काढून निकेश जगदाळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याच्या आणि काठीच्या साह्याने मारहाण सुरु केली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निकेश यांच्यावर सध्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आठही आरोपींवर अंबाजोगाई शहर पोलिसात कलम ३०७, ३२३, ३२४, १०९, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार भुजबळ करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.