अंबाजोगाईचे बसस्थानक मराठवाड्यात 'स्वच्छ सुंदर'; सलग दुसऱ्या वर्षी प्रथम, १० लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 07:57 PM2024-06-26T19:57:41+5:302024-06-26T19:58:10+5:30
समितीकडून प्रत्येक दोन महिन्यांच्या अंतरात होते तपासणी
- समर्थ भांड
बीड : राज्यातील सगळे बसस्थानक स्वच्छ व सुंदर असावेत, यासाठी राज्य शासनाकडून 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत सलग दुसऱ्यावेळी अंबाजोगाई बसस्थानक छत्रपती संभाजीनगर प्रदेशात प्रथम आले आहे. यामुळे या बसस्थानकाला १० लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानासाठी राज्य परिवहन महामंडळामध्ये मध्यवर्ती व विभागीय स्तरावर दोन समित्या स्थापन केल्या आहेत. या अभियानातून स्वच्छता आराखडा तयार केला जातो. तसेच यासाठी १०० गुणांपर्यंत मूल्यांकन करुन गुण दिले जातात. यामध्ये ७६ गुण मिळवत अंबाजोगाई बसस्थानक छत्रपती संभाजीनगर प्रदेशातून प्रथम आले आहे. प्रदेशात अ, ब, क अशाप्रकारे बक्षीसाची वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकातील बसस्थानकासाठी १० लाख, द्वितीय साठी ५ तर तृतीय स्थानी राहिलेल्या बसस्थानकासाठी २.५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते.
दरम्यान या मूल्यांकनासाठी विभागस्तरावर विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. यात विभागीय स्थापत्य अभियंता, उपयंत्र अभियंता, विभागीय कामगार अधिकारी व प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. समितीकडून प्रत्येक दोन महिन्यांच्या अंतरात मध्यवर्ती समितीने ठरवून दिलेल्या विभागाची तपासणी होते. एकूण गुणांच्या ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असणाऱ्या बसस्थानकांचा विचार या पुरस्कारासाठी केला जातो.
मागीलवर्षी देखील अंबाजोगाई बसस्थानकाने प्रथम येण्याचा बहुमान नोंदवला आहे. छत्रपती संभाजीनगर प्रदेशातून दोन्ही वर्षी बीड विभागातील बसस्थानकाचा नंबर आला. सर्व चालक- वाहक, अधिकारी- कर्मचाऱ्यांचा हा सन्मान आहे.
- अजयकुमार मोरे, रापम विभाग नियंत्रक, बीड