अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:57 AM2018-02-07T00:57:46+5:302018-02-07T01:01:05+5:30

बीड जिल्ह्याचे विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी कायम आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून विविध मार्गाने जनआंदोलनाचा रेटा कायम आहे. शासनाने ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा घाट घालून पालघर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आणला. मात्र, अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी जुनी असूनही या मागणीकडे मात्र प्रशासनाने पाठ फिरवल्याने विझलेल्या धगधगत्या निखा-यावर फुंकर घालण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे.

Ambajogai district became a bhijat gongade | अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे कायम

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे कायम

googlenewsNext
ठळक मुद्दे३० वर्षाचा लढा; सुटला नाही तिढा तीन दशकांपासून शासनाची टोलवाटोलवीच; नेत्यांच्या सभेत नुसती आश्वासनेच

अविनाश मुडेगावकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी कायम आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून विविध मार्गाने जनआंदोलनाचा रेटा कायम आहे. शासनाने ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा घाट घालून पालघर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आणला. मात्र, अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी जुनी असूनही या मागणीकडे मात्र प्रशासनाने पाठ फिरवल्याने विझलेल्या धगधगत्या निखा-यावर फुंकर घालण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे.

पालघर बरोबर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची प्रक्रियाही सहज घडली असती. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनास ख-या अर्थाने वेग आला तो १९८८ पासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीवर शहरात बैठका झाल्या आणि हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रकर्षाने मांडण्यात येऊ लागला. तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन दिले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व कै. गोपीनाथराव मुंडे यांनी केले होते. तर तत्कालिन नगराध्यक्ष कै. अरूण पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेपासून आंदोलनाचे निखारे कायम तेवत राहिले आहेत. जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष कै. शंकरराव डाके, कै. अरूण पुजारी, नंदकिशोर मुंदडा, राजकिशोर मोदी, डॉ. द्वारकादास लोहिया, अमर हबीब, अशोक गुंजाळ, राजेसाहेब देशमुख यांनी जिल्हा निर्मिती आंदोलनाची कृती समितीची धुरा सांभाळत आंदोलनात राजकीय पक्ष आपले मतभेद व पक्षविधी निषेध बाजूला ठेवून सक्रिय झाले व हीच भूमिका आजही कायम आहे.

१९६२ पासून जिल्हा निर्मितीची मागणी
स्वातंत्र्यानंतर १९६२ साली सामाजिक कार्यकर्ते तथा नगराध्यक्ष नाना जोशी यांनी दोन ठराव मांडले होते. मोमीनाबाद ऐवजी अंबाजोगाई असे शहराचे नामकरण करा व अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती व्हावी यापैकी अंबाजोगाई हे नाव अस्तित्वात आले. मात्र, अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी आजही ५६ वर्षानंतर प्रलंबितच आहे.

असा असेल नियोजित अंबाजोगाई जिल्हा
बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई नियोजित जिल्हा सहा तालुक्यांचा असणार आहे. यात अंबाजोगाई, परळी, माजलगाव, केज, धारूर, रेणापूर, या तालुक्यांचा समावेश असेल.
नियोजित अंबाजोगाई जिल्ह्यात सहा तालुके, ७१६ गावे तर अंबाजोगाई शहरापासून सहाही तालुक्यांचे अंतर ४० ते ६० कि.मी. अंतराचे असेल.

सातत्याने झाली आश्वासनानेच बोळवण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ज्या ज्या वेळी अंबाजोगाईला आले, त्या त्या वेळी आपल्या भाषणाचा रोख जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाकडे वळवित असत. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी आपली भूमिका आग्रही असून या मागणीच्या पाठपुराव्यासाठी मी अंबाजोगाईकरांसोबत आहे. एवढेच नव्हे तर अंबाजोगाई जिल्हा झाल्याशिवाय मी अंबाजोगाईत फेटा बांधणार नाही. अशी भीष्म प्रतिज्ञाही पवारांनी सभेतील हजारोंच्या जनसमुदायांसमोर केली होती. या आश्वासनात कै. मुख्यमंत्री विलासराव देशमुखही मागे राहिले नाहीत. त्यांनीही अंबाजोगाई जिल्हा झालाच, असे समजा असे सांगून जेव्हा जेव्हा जाहीर सभा झाल्या. तेव्हा तेव्हा विलासरावांनी जिल्हा निर्मितीच्या प्रश्नावर अंबाजोगाईकरांच्या टाळ्या मिळवल्या.
या शिवाय माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार, गोपीनाथराव मुंडे यांनीही अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला वेळोवेळी पाठिंबाच दर्शविला. या सर्व राजकीय पुढाºयांची जिल्हा निर्मितीला अनुकुलता राहिली. मात्र या मागणीचे राजकीय भांडवल मात्र कायम राहिले. कोणत्याही निवडणुकीत जिल्हा निर्मितीचा प्रश्न चर्चिला गेला नाही, अशी एकही निवडणूक झाली नाही. मात्र बोळवण झाली ती केवळ आश्वासनानेच. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

हायटेक कार्यालये अंबाजोगाईत कार्यान्वित
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी यासाठी जिल्हा निर्मितीला पूरक असणारी सर्वच कार्यालये अंबाजोगाईत गेल्या दहा वर्षांपासून कार्यान्वित आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात डॉ. विमल मुंदडा सलग दहा वर्षे विविध खात्याच्या मंत्रिपदावर होत्या. या कालावधीत त्यांनी अंबाजोगाई जिल्ह्याच्या धर्तीवरच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूसंपादनाची तीन कार्यालये अशी जिल्हा निर्मितीसाठी पूरक असणारी कार्यालय अंबाजोगाईत विमल मुंदडा यांनी सुरू केली. आता सर्व अनुकुलता उपलब्ध असूनही अडसर कशासाठी? हा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.

अभी नही तो कभी नही एक धक्का और दो....
नांदेड व लातूर या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र आयुक्तालय करण्याच्या जोरदार हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. लातूर येथे स्वतंत्र महसूल आयुक्तालय सुरू करण्यासाठी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती हा प्रशासनासमोर महत्त्वपूर्ण पर्याय ठरणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून अंबाजोगाईकरही जिल्हा निर्मितीच्या मागणीवर ठाम आहेत. आता हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी एक धक्का और दो म्हणत अभी नही तो कभी नही हा नारा देत अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आंदोलन पुन्हा सक्रिय झाले तरच हाता-तोंडाशी आलेला हा घास पदरी पडेल. अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Ambajogai district became a bhijat gongade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.