परिवर्तनाचा लढा; रूढी परंपरा मोडीत काढत महिलांनी केला मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 04:35 PM2022-09-18T16:35:34+5:302022-09-18T16:35:42+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील महिलांच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र स्वागत
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई- तालुक्यातील धानोरा (बुद्रुक) येथील महिलांनी रविवारी सकाळी एकत्रित येऊन मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. वर्षानुवर्षे प्रवेशासाठी मज्जाव असणारी ही रूढी-परंपरा आज महिलांनी संघटित होऊन मोडीत काढली. ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन पुकारलेल्या या परिवर्तनाच्या लढ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
धानोरा गावातील महिला मंडळाच्या बैठकीत महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसणे आणि पुरुषांना प्रवेश असणे म्हणजे लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव आहे. महिलांना केवळ मासिक पाळी येते आणि त्या काळात तिला विटाळ म्हणून लांब ठेवणे योग्य नाही. तर महिलेच्या मासिक पाळीमुळे सर्वांच्या जन्माची वेळ येते. त्यामुळे मासिक पाळीला आनंदाने समाजाने स्वीकारले पाहिजे. असे मत गावातील सामाजिक कार्यकर्त्या आशालता आबासाहेब पांडे यांनी व्यक्त केले.
त्यांनी गावातील सर्व महिलांना संघटित करून हा लढा उभारला. मासिक पाळी मध्ये विटाळ नसतो तर टी एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्याने देवाला विटाळ होत नाही. तर माणसांनी तयार केलेली हि प्रथा आज पासून बंद करण्याचा निर्णय गावातील महिलांनी केला. रविवारी सकाळी आशालता आबासाहेब पांडे, चित्रा बाळासाहेब पाटील यांनी निश्चिय व्यक्त करून महिलांना सोबत घेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि मारूतीच्या गाभाऱ्यात जाऊन नारळ फोडले.
महिलांना मज्जाव असतो ही पिढ्यां न पिढ्यांनपासून चालत आलेली प्रथा परंपरा आज महिलांनी मोडीत काढली. मारोती हा ब्रह्मचारी आहे, तसेच नारळ हे फक्त पुरुषांनीच फोडायचे, या सामाजिक व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न आज धानोरा बु. येथील एकल महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आशालता आबासाहेब पांडे व चित्रा बाळासाहेब पाटील व महिला मंडळातील सर्व महिलांनी केला आहे.
महिला आहे म्हणूनच सगळं आहे. ती स्वतः एक जननी आहे. मग तिलाच या प्रथा का बाळगाव्या लागतात. एकल महिला संघटना ही महिलांना मान सन्मान व ती आर्थिक , सामाजिक , राजकीय शैक्षणिक , सांस्कृतिक स्तरावर स्वतंत्र होण्यासाठी काम करते. आम्हाला पण भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करून आगामी काळात ही महिलांचे मजबूत संघटन करून जुन्या प्रथा, अंधश्रद्धा मोडीत काढू
-:आशालता पांडे,सामाजिक कार्यकर्त्या,अंबाजोगाई.