अंबाजोगाई - पुणे प्रवासात ट्रॅव्हल्सच्या डिकीतून ३ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:30 AM2017-12-29T00:30:43+5:302017-12-29T00:30:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : डुप्लीकेट चावीने ट्रॅव्हल्सची डिकी उघडून प्रवाशांनी डिकीत ठेवलेल्या बॅगातून चोरट्यांनी जवळपास तीन लाख रुपयांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : डुप्लीकेट चावीने ट्रॅव्हल्सची डिकी उघडून प्रवाशांनी डिकीत ठेवलेल्या बॅगातून चोरट्यांनी जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना अंबाजोगाई - पुणे प्रवासादरम्यान सोमवारी रात्री घडली.
नांदेडच्या सिडको भागात राहणारे श्रीकांत जगन्नाथ येईवाड हे सोमवारी रात्री त्यांच्या पत्नीसह खाजगी बस (एमएच २२ एन ५०५१) मधून पुण्याकडे निघाले होते. त्यांच्यासह अन्य प्रवाशांनी बॅगा ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत ठेवल्या होत्या.
अंबाजोगाईपासून पुढे कधीतरी अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या साह्याने डिकी उघडून येईवाड यांच्या बॅगेसह अन्य प्रवाशांच्या बॅगा लंपास केल्या. श्रीकांत येईवाड यांच्या लंपास झालेल्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांसह अन्य प्रवाशांच्या ऐवजाची एकूण किंमत २ लाख ८५ हजार एवढी आहे.
पुण्यात उतरल्यानंतर चोरी झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले आणि त्यांनी विमानतळ पोलिसात आॅनलाईन फिर्याद नोंदविली. तेथून ही फिर्याद अंबाजोगाई शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.