सततच्या वाहतूक कोंडीने अंबाजोगाईकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:33+5:302021-04-01T04:33:33+5:30
अंबाजोगाई शहर हे प्रस्तावित जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी हजारोंच्या ...
अंबाजोगाई शहर हे प्रस्तावित जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी राहतात. शाळा-महाविद्यालयांच्या रस्त्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या उद्भवलेली आहे. त्याचप्रमाणे भगवान बाबा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, यशवंतराव चव्हाण चौक, पाण्याची टाकी, अण्णाभाऊ साठे चौक, मंडी बाजार, वैद्यकीय महाविद्यालय परिसर, प्रशांत नगर इत्यादी ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. काही वर्षांपूर्वी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरांमधील चौकाचौकात सिग्नल बसविण्यात आले होते. परंतु या सिग्नलचा वापरच अद्याप होत नसल्याकारणाने वाहतूक अत्यंत बेशिस्त झालेली आहे.
वाहतुकीच्या समस्येबाबत शहरवासीयांनी त्याचप्रमाणे विद्यार्थी, व्यापारी यांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. परंतु पोलीस प्रशासनाकडून केवळ आश्वासनाची खैरात वाटली जाते. नवीन पोलीस अधिकारी आल्यास अंबाजोगाईचे नागरिक वाहतुकीच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यास भेटतात आणि त्यांना वाहतूक सुरळीत करावी अशी आवर्जून विनंती करतात. परंतु ह्या विनंतीचा व निवेदनांचा पोलीस गांभीर्याने विचार करत नाहीत. शहरातील मंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रशांत नगर याठिकाणी वन वे वाहतुकीची आवश्यकता आहे. असे केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक नाहीत. त्यामुळे आणखीनच समस्या निर्माण होते आहे.
तसेच मुख्य रस्त्यावरती, नगरपालिकेसमोर सकाळी सात वाजल्यापासून भाड्याने चालणाऱ्या कार व जीप उभ्या करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
खेडोपाडी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोंची संख्याही कमी नाही. त्याचप्रमाणे भाजीपाला विक्रेते, हातगाडे यांचाही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. वंजारी वस्ती वसतिगृह, पंचायत समिती, प्रशांत नगर पाण्याची टाकी या परिसरामध्ये उभ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. वेगवेगळ्या बँकांची, व्यावसायिकांच्या, दवाखान्याची वाहने बिनदिक्कत रस्त्यावर उभी केली जातात.
आठवडी बाजाराच्या दिवशी तर आंबेडकर चौकापासून योगेश्वरी महाविद्यालयापर्यंत मुख्य रस्त्यावरून चालणेही मुश्कील होते. भाजीपाला विक्रेते मुख्य रस्त्यावर दुतर्फा बसतात आणि ग्राहकही आपल्या गाड्या रस्त्यावरच उभ्या करतात. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. काही सांगायला गेल्यावर सांगणाऱ्यालाच उलट सुलट बोलले जाते. अंबाजोगाई शहरातील वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर झालेली असून अपघाताचे प्रमाणही वाढलेली आहे. यावरती ठोस पर्याय काढून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
===Photopath===
310321\avinash mudegaonkar_img-20210331-wa0032_14.jpg