अंबाजोगाईची नवी ओळख 'पुस्तकांचं गाव'; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:17 IST2025-04-16T19:17:34+5:302025-04-16T19:17:34+5:30

राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने 'पुस्तकांचं गाव' योजना राबविण्यात येते.

Ambajogai's new identity is 'Pustkanche Gav'; Marathi Language Minister Uday Samant announced | अंबाजोगाईची नवी ओळख 'पुस्तकांचं गाव'; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

अंबाजोगाईची नवी ओळख 'पुस्तकांचं गाव'; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

अंबाजोगाई : उच्च तंत्र शिक्षण, उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज अंबाजोगाई शहरास 'पुस्तकांचं गाव' म्हणून घोषित केले. अंबाजोगाई राज्यातील "पाचवे" पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाईल. यामुळे शहराच्या मराठी साहित्य निर्मिती परंपरेचा एकप्रकारे गौरवच झाला आहे.

राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने 'पुस्तकांचं गाव' योजना राबविण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्यावतीने  २०१७ साली तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून 'पुस्तकांचं गाव' हा उपक्रम सुरू करण्यात आला. या संकल्पनेतून ४ मे २०१७ साली सातारा जिल्ह्यातील "भिलार" हे गाव  'पुस्तकांचं गाव'  म्हणून घोषित करण्यात आले आणि याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री मा.ना.विनोद तावडे यांनी एका वाचनालयाची सुरुवात भिलार या गावात करण्यात आली. या भिलार गावातील प्रत्येक घरात एक छोटी लायब्ररी आहे. जिथे विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. येथे प्रत्येक घरात वाचनासाठी प्रवेश खुले आहेत. त्यामुळे नागरीक आणि पर्यटक या घरांमध्ये जावून पुस्तके वाचू शकतात. या गावात २५ घरांमध्ये १५ हजारहून अधिक पुस्तकांसह तेंव्हा हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. याच धर्तीवर आता अंबाजोगाईमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

दरम्यान, आज मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी अंबाजोगाई शहराचा 'पुस्तकांचं गाव' या उपक्रमात समावेश केल्याची घोषणा केली.  'पुस्तकांचं गाव' म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करण्यात यावीत. या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. तसेच त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशने उपलब्ध असावीत, शिवाय येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही राज्य शासनाच्या वतीने मराठी भाषा मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत. या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेस दिले.

शहराला मराठी साहित्यिकांची परंपरा
अंबाजोगाई शहरात पुरातन काळापासून साहित्याचा निवास आहे. मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराज स्वामी, पासोडीकार संत दासोपंत यांच्या पासून सुरु झालेली साहित्य सेवा आज ही अव्याहतपणे सुरूच आहे. त्यामुळे या शहराचा  'पुस्तकांचं गाव' या योजनेत केलेला समावेश हा शहरातील साहित्य सेवेचा गौरवच आहे.

राजकिशोर मोदींच्या पाठपुराव्याला यश
अंबाजोगाई शहरास 'पुस्तकांचं गाव' म्हणून जाहीर करावे. याकरिता माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महाराष्ट्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांनी वैयक्तिकरित्या मंत्री उदय सामंत यांच्याकडे व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे जुलै २०२४ मध्येही पत्राद्वारे मागणी केली होती. मोदी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले.

Web Title: Ambajogai's new identity is 'Pustkanche Gav'; Marathi Language Minister Uday Samant announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.