अंबाजोगाईत ‘शुभकल्याण’चा ३ कोटींना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:17 AM2018-01-31T00:17:49+5:302018-01-31T00:17:52+5:30
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘शुभकल्याण मल्टीस्टेट’च्या संचालक मंडळावर माजलगाव, परळी पाठोपाठ अंबाजोगाईतही गुन्हा ...
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘शुभकल्याण मल्टीस्टेट’च्या संचालक मंडळावर माजलगाव, परळी पाठोपाठ अंबाजोगाईतही गुन्हा दाखल झाला आहे. आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ‘शुभकल्याण’ने अंबाजोगाईतील ३९ ठेवीदारांच्या तीन कोटींवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.
शुभकल्याण मल्टीस्टेटने २०१४ साली अंबाजोगाईत मोठ्या थाटामाटात शाखा उघडली होती. अत्याधुनिक आॅफिस थाटून आणि आकर्षक व्याजाच्या योजना सांगून ठेवीदारांना भुलविले जाऊ लागले. मल्टीस्टेट कडून पॉम्प्लेट, होर्डिंग आदीच्या माध्यमातून सातत्याने जाहिरातींचा मारा होऊ लागला. शाखाधिकारी आणि कर्मचारी देखील नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन गुंतवणुकीसाठी आमंत्रित करू लागले.
या जाहिरातींना भुलून वाढीव व्याजदराच्या आमिषाने अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त कर्मचारी दिलीपसिंह शंकरसिंह ठाकूर आणि अन्य ३८ जणांनी आयुष्यभर मेहनतीने आणि काटकसरीने जमा केलेली एकूण ३ कोटी २ लाख ६२ हजार २५० एवढी रक्कम ‘शुभकल्याण’मध्ये ठेवींच्या स्वरुपात गुंतविली. मात्र, ठेवीची मुदत उलटून गेल्यानंतर शुभकल्याण कडून रक्कम माघारी देण्यास टाळाटाळ होऊ लागली. नोव्हेंबर - २०१६ पासून या संस्थेच्या अंबाजोगाई शाखेतील व्यवहार पूर्णपणे बंद झाले. त्यानंतर मात्र गुंतवणूक दारांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे, ठेवीदारांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन मुख्य कार्यालयाशी देखील संपर्काचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.
मागील काही महिन्यापासून शुभकल्याण बद्दल वृत्तपत्रातून उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. माजलगाव आणि परळी येथे शुभकल्याणच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे अंबाजोगाईतील ३९ ठेवीदारांनीही एकत्र येत शुभकल्याणचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापक, कर्मचाºयांविरोधात शहर ठाण्यात फिर्याद दिली.
यांच्याविरुद्ध अंबाजोगाईत गुन्हा दाखल
याप्रकरणी मल्टीस्टेटचे अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट, संचालक भास्कर बजरंग शिंदे, अजय दिलीप आपेट, नागिनीबाई बजरंग शिंदे, विजय दिलीप आपेट, कमलबाई बाबासाहेब नखाते, शालिनी दिलीप आपेट, अभिजीत दिलीप आपेट, प्रतिभा अप्पासाहेब आंधळे, आशा रामभाऊ बिरादार, बाबुराव ज्ञानोबा सोनकांबळे, शशिकांत राजेंद्र औताडे यांच्यावर कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार वाघमारे तपास करत आहेत.